अमळनेरला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून शासनाची मान्यता; नाशिक महसूल विभागात प्रथम बहुमान

अमळनेर : ‘पुस्तकाचे गाव’ विस्तार योजनेंतर्गत नाशिक महसुली विभागातील अमळनेर, जि. जळगाव येथील पुस्तकांच्या गावांना मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक २०.०८.२०२४ रोजी शासन निर्णय परिपत्रकाद्वारे पुस्तकांचे गाव संबंधीचे पत्र निर्गमित केले आहे. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ‘पुस्तकाचे गाव’ ही योजना विस्तारीत स्वरुपात ६ महसूली विभागात सुरु केली आहे.त्या नुसार नाशिक महसूल विभागात अमळनेरला हा प्रथम बहुमान मिळाला आहे.

पुस्तकांचे गाव एक संक्षिप्त इतिहास :

‘ हे ऑन वे ‘ या वेल्स (इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर ‘पुस्तकांचं गाव’ ही संकल्पना अस्तित्वात आली. ‘पुस्तकांचं गाव’ या योजनेची लोकप्रियता लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी तसेच भाषेची आवड वाढावी या मूळ उद्देशाने ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना उदयास आली. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन दि. ४ मे २०१७ रोजी करण्यात आले होते. ‘पुस्तकांचं गाव’ योजनेची व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने तसेच मा.मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात एक ‘ पुस्तकांचं गाव ‘ सुरु करुन योजनेचा अधिक विस्तार करणे बाबतचा निर्णय अलिकडे घेण्यात आला. ‘पुस्तकांचं गाव ‘ ही योजना विस्तारीत स्वरुपात सुरु करताना पहिल्या टप्प्यात ६ महसूली विभागात सुरु करण्यात येणार असून कोकण विभागातील पोंभुर्ले या गावानंतर नाशिक विभागातील अमळनेर येथे लवकरच ‘पुस्तकांचं गाव’ योजना उभारण्यात येणार आहे.

खानदेशात जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे प्राचीन गाव म्हणजे अमळनेर. पूज्य साने गुरूजी यांचे वास्तव्य अमळनेेर येथे होते. स्वातंत्र्य पूर्व काळात साने गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुल मध्ये अध्यापन केले. पूज्य साने गुरूजी व कर्मयोगी प्रताप शेठजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अमळनेर येथे ‘पुस्तकांचं गाव’ उभारण्यात येणार असून ही निश्चितच खानदेश साठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. अमळनेर येथे पुस्तकांचे गाव उभारण्याची कार्यवाही राज्य मराठी विकास संस्थेद्वारे (मुंबई) करण्यात येणार आहे. योगायोग असा की, डॉ.शामकांत देवरे हे ह्या संस्थेचे संचालक असून ते या भूमीचे सुपुत्र आहेत, खानदेशकरांच्या दृष्टीने हा दुहेरी आनंद आहे.

प्रस्तुत बहुमानाची एक पूर्वपीठिका म्हणजे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभाला अर्थात ४ फेब्रुवारी २०२४ रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमळनेरला पुस्तकाचे गाव योजना जाहीर करण्या संदर्भात आपल्या मनोगतात नमूद केले होते. तसेच शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सुद्धा या विषयाची मांडणी केली होती. महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ९७ वे अ. भा. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार गिरीष महाजन तसेच नामदार अनिल पाटील यांनी अमळनेरला ‘पुस्तकाच गाव’ जाहीर करण्या संदर्भात शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले. ’अमळनेर’ हे पूर्वी पासूनच साहित्य नगरी म्हणून सर्वाना परिचित आहे. इतिहास पाहिला तर अमळनेरला पूर्वी victoria Jubilee Library होती. त्याचे नाव आता बदलले असून आता पूज्य साने गुरुजी ग्रंथालय असे झाले आहे.

पाच ठिकाणी होणार ग्रंथालये… प्रत्येकी पाच लाख रुपये मिळणार

अमळनेर शहरात पाच ठिकाणी होणा-या नवीन ग्रंथालयासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये मिळणार आहेत. यात, १) खा. शि. मंडळ, अमळनेर, २) संत सखाराम महाराज वाडी संस्थान, ३) विक्टोरिया ज्युबिली ग्रंथालय, ४) मंगळ ग्रह संस्था, ५) मराठी वाड्मय मंडळ यांचा समावेश आहे. प्रस्तुत शासकीय योजनेच्या मान्यतेसाठी राज्याचे अप्पर मुख्य सचिव सौ. मनिषा पाटणकर- म्हैसकर, खानदेश पुत्र शामकांत देवरे (अध्यक्ष, राज्य मराठी विकास संस्था), जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आग्रह धरला. या सर्व प्रक्रियेचा पाठपुरावा खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष सीए निरज अग्रवाल यांनी केला. यामुळे घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमळनेर येथे खान्देश शिक्षण मंडळाच्या परिसरात ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले. खा. शि. मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्राचार्य, उप प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षकेत्तर वृंद यांचा सहभाग व संस्थेतील पायाभूत सुविधा पाहता खा. शि मंडळाला हा बहुमान मिळावा, असे सर्वांना वाटत होते

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!