माजी आमदार तथा साथी गुलाबराव पाटील पुरस्काराचे दिमाखात वितरण

राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांचाही झाला सन्मान

अमळनेर : अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळा तर्फे आयोजित माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ काल शनिवार, दि. २४ रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या समारोहात राजकीय व सामाजिक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. साथी गुलाबराव पाटील सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी प्राचार्य मधुकर भोजू शिरसाठ यांना तर राजकीय पुरोगामी पुरस्कार प्राध्यापक सुधीर गोतमारे यांना देण्यात आला. व्यासपीठावर असलेल्या चंद्रपूर येथील ज्येष्ठ समाजवादी दामोदर वाढवे, धुळे येथील रमेश दाणी, संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. लाल टोपी, रुमाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रुपये पंचवीस हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते. सोबत व्यासपीठावर गुणवंतराव पाटील, ॲड. अशोक बावस्कर, किरण पाटील, भास्कर बोरसे, प्राचार्य मगन पाटील आदी उपस्थित होते. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी प्रास्ताविकातून स्वर्गीय बापूंच्या स्मृतींना उजाळा दिला. सोबतच सामाजिक व राजकीय पुरस्कार देण्यामागील उद्देश सांगितला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेते अनुक्रमे यश रविंद्र पाटील, कु. कोमल नरेंद्र शेलार व वरुण प्रकाश घरटे यांना अनुक्रमे ११ हजार, ९ हजार, ७ हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले. वक्तृत्व गाजवणाऱ्या या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मंचावर पुरस्कारार्थीं समोर आपले वक्तृत्व सादर करण्याची संधी मिळाली. मनोगत व्यक्त करताना पुरस्कारार्थी मधुकर शिरसाठ यांनी साथी गुलाबराव पाटील यांचा अमळनेरच्या विकासात सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. हरिजन सेवक संघाचा जनरल सेक्रेटरी म्हणून केलेली कामे आणि त्यातून उभे राहिलेले राजेंद्र छात्रालय, काकासाहेब बर्वे मुलींचे छात्रालय या मागची यशोगाथा विशद केली.

पुरस्कारार्थी प्रा. सुधीर गोतमारे यांनी केलेली विकास कामे इतरांना कसे आदर्श ठरू शकतात याबाबत माहिती दिली. गाव विकसित कसे करावे ? यासंदर्भात विचार प्रबोधन केले. पुरस्काराने माणसाला उर्जा मिळते असे सांगत गावाचा विकास करायचा असेल तर लोकसहभाग हवा, वैचारिक प्रगल्भता असलेली लोकं लोकशाही साठी आवश्यक आहेत. मार्गदर्शनाचा प्रभाव पडतो. गावाला साजेसे काम करावे. जनतेला फुकटच्या योजना पंगू बनवते हे लक्षात घेऊन लोकांना स्वावलंबी बनवले पाहिजे असा सल्ला दिला. सरपंच पदाच्या काळात ८०० फुटावरील पाणी २०० फुटावर आणले. पाणी, शिक्षण, आरोग्य यावर काम केल्यानेच गावाच्या विकासासाठी ४७ कोटी निधी मिळाला. शाश्वत स्वरूपाची कामे करीत विकास केल्याने अमेरिका, इंग्लंड, युनिसेफ ची पथके आज गावाची पाहणी करायला येतात. कामात पारदर्शकता ठेवली, लोकसहभाग वाढवला त्यामुळे आदर्श गाव करू शकलो असेही सांगितले.

नाट्यगृह ची संकल्पना घेऊन जातोय…

अमळनेर मधून एक गोष्ट शिकता आली ती म्हणजे नाट्यगृह उभारण्याची संकल्पना. जे काम आजपर्यंत गावात झाले नाही ते नाट्यगृह लवकरच उभारण्याची ईच्छा पुरस्कारार्थी प्रा. सुधीर गोतमारे यांनी प्रगट केली.

ज्येष्ठ समाजवादी दामोदर वाढवे म्हणाले की, इंदिराजी गांधी पंतप्रधान असताना लावलेल्या आणीबाणीमुळे तुरुंगात असताना नाशिक येथे बापूंची भेट घडली आणि माझं आणि बापूंचं नातं तेथेच घट्ट  झाले. तेच कारागृह कार्यकर्त्यांचे प्रबोधन केंद्र बनले. बापूंच्या प्रभावाखाली काम होत असे. रडत जाणाऱ्या ला हसत पाठविण्याची कला बापूंमध्ये होती.  पोलीसांना फुल गणवेशाची सूचना बापूंचीच होती. त्यावेळी भाई वैद्य यांची शिफारस घेऊन मुख्यमंत्री शरद पवार यांचेकडे ती सूचना मंजूर करण्यात आली. कवी जगदीश देवपूरकर यांनी कवितेतून बापूंच्या स्मृतींना उजाळा दिला. २८८ आमदारात इंटर्व्हल करणारा एकमेव आमदार म्हणजे गुलाब बापू होते असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे आणि जे. एस. पाटील यांनी केले. आभार संचालक ॲड. अशोक बाविस्कर यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!