राजकीय दर्जाही खालावला असून यास राज्यकर्ते तितकेच दोषी
शिर्डी : पूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता यामध्ये बरीच तफावत दिसून येते. पत्रकारांनी आपल्या लेखणीचा दर्जा उंचावण्याची गरज असून समाजात वावरताना पत्रकारांचा संवाद संपत चालला ही चिंतेची बाब बनत आहे. त्यावर चिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे नुकतेच संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पूर्वी वेगवेगळ्या विषयावर लिखाण होत असे, विकासाचे मुद्दे, लोकांचे विषय, राजकीय भूमिका आदी विषयांवर लिखाण होत असे. प्रिंट मीडियाचे महत्व कमी झाले, इलेक्ट्रॉनिक मीडिया काही प्रमाणात मागे पडत आहे तर सोशल मीडियाने आपला ताबा या प्रसार माध्यमांवर मिळविलेला आहे. ही आव्हाने माध्यमांना पेलावी लागणार आहेत. पूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता यामध्ये बरीच तफावत असून पत्रकारांनी आपल्या लेखणीतून दर्जा उंचवावा. दुसरीकडे राजकीय स्थितीचाही दर्जा खालावला असून यास राज्यकर्ते तितकेच दोषी असल्याचेही ते म्हणाले. फेक नॅरेटिव्हचे प्रस्थ वाढत चालले आहे. पूर्वी राज्यकर्ते घोषणा ठरवत होते. आता यामध्ये माध्यमाचा सहभाग वाढला असून आता ठरावच माध्यमे ठरवत आहेत. राजकारण आणि प्रसार माध्यमे हे एकाच नावेत दोघेही बसले असून त्यांनी आपले दायित्व वेळीच ओळखले पाहिजे. स्वतःमध्ये बदल केले नाही तर आपणास त्याची किंमत मोजावी लागेल. माध्यमांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. बदल स्विकारले पाहिजे. मनुष्यबळ ही एक चिंतेची बाब असून विशिष्ट तंत्रज्ञानाने भविष्य चालणार आहे. पत्रकारांचा संरक्षण कायदा, प्रलंबित प्रश्न, पेन्शन योजना याबाबतही विचार झाला पाहिजे. मालकांनी पत्रकारावर स्वतःचा हक्क लादला असून ही गदा बनल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांचे घर, लग्न, शिक्षण जीवघेणी स्पर्धा, यामुळे पत्रकार कात्रीत सापडलेला असून आयोगाने ठराव करण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तरच पत्रकारांच्या जीवनात स्थैर्य येईल. पत्रकारांचे जीवनात अस्थैर्य नको. नवी मुंबई आणि ठाणे येथे पत्रकारांच्या जागेसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उद्योजक राणा सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, अहमदनगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने आदी उपस्थित होते.