मंगळग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडिया ने जपली सामाजिक बांधिलकी; शंभरहून अधिक गणेश मंडळांना केले सन्मानित

अमळनेर : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवार, दिनांक १७ रोजी अमळनेर शहरातील गणेश मंडळे व गणेश भक्त आपल्या लाडक्या गणेश बाप्पाचे विसर्जनासाठी डीजे व ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीत सहभागी झाले होते. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी असंख्य भाविकांनी तोबा गर्दी केली होती. अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व देशातील क्रमांक १ ची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विसर्जन मिरवणुकांचे दगडी दरवाजासमोर सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे दोन्ही संस्थांकडून फ्रेमसह सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले. दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पांढरा कुर्ता पायजमा, केशरी टोपी, बॅच असा पोशाख परिधान केला होता. सर्वांनी येणाऱ्या गणेश मंडळे व भक्तांचे सातव्या, नवव्या व अकराव्या दिवशी स्वागत केले. विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखून विसर्जन करणाऱ्या सुमारे शंभरहून अधिक सर्वधर्मीय गणेश मंडळांना सन्मानित करण्यात आले. गणेश मंडळांचा सन्मान झाल्याने त्यांचा उत्साह वाढलेला होता. ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

विसर्जन मिरवणुकीत शिवछत्रपतींचा इतिहास, महिला सुरक्षितता, क्रांतिकारकांचे योगदान, देशसेवा, गो हत्या, धार्मिकता आदी विषयांवर जनजागृती करण्यात आली. बहुरंगी फुले, पाकळ्या, गुलालाची उधळण करण्यात येत होती. सर्व धर्मीयांची लक्षणीय उपस्थिती होती. महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ठिकठिकाणी गणरायाची आरती करण्यात आली. शहरातील दगडी दरवाजा म्हणजे विसर्जन मिरवणुकीचा शेवटचा टप्पा. याठिकाणी सर्वच मंडळे एकत्र येत असल्याने गर्दी होते साहजिकच दगडी दरवाजा वरील स्लॅबवर बसून अनेकांनी बाप्पा चे दर्शन घेतले. पवनपुत्र गणेशोत्सव मित्र मंडळ, भोईवाडा यांनी हनुमान चालीसा पठण केले. शेवटच्या टप्प्यात भोईवाडा, माळी वाडा, पान खिडकी येथील गणेश मंडळाचे स्वागतासाठी उशिरापर्यंत गणेश भक्त थांबले होते. व्यसनाधीन भक्तांनी देखील विसर्जन मिरवणुकीत मनमुराद आनंद घेतला पण.. व्यसनाचे विसर्जन केले की नाही ते बाप्पालाच सांगता येईल. एकंदरीत शहरातील गणेश विसर्जन शांततेत पार पडले. दगडी दरवाजा जवळ मोठी गर्दी झाल्याने विसर्जन मिरवणुकीतील वाहने पुढे काढताना पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होत्या. डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचे मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस प्रशासन, आरसीपी प्लाटून, एस आर पी एफ, ट्रेकिंग फोर्स, होमगार्डस् यांनी चोख बंदोबस्त ठेवला. सोबतच व मंगळग्रह सेवा संस्थेचे सुरक्षा रक्षकांची फौज आपले कर्तव्य बजावत होती. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हॅंडी कॅमेरे, ड्रोन कॅमेरा द्वारे क्षण टिपले जात होते. महावितरण विभागातील अभियंता व सहकारी देखील सेवेसाठी तत्पर होते. विसर्जनाच्यापूर्वी व दुसऱ्या दिवशी आरोग्य विभागाच्या टीमने रस्त्यांवर साचलेला गुलाल व कचरा उचलून शहर स्वच्छ केले.
क्रांतिकारकांच्या फोटो फलकांसोबत संभाजी भिडे व नथुराम गोडसे झळकले; ठरला चर्चेचा विषय…

शहरातील एका गणेश मंडळाने सुंदर असा ‘नाद एकच.. हिंदूराष्ट्र’ देखावा केला होता. भारतमातेच्या फोटो फलकावर ‘माॅं तुझे सलाम’ लिहिलेले होते. देशासाठी शहीद झालेल्या भगत सिंग, शिवराम राजगुरु, सुखदेव थापर आदी क्रांतिकारकांचे फोटो फलक हाती घेत गणेश भक्तांनी मिरवणुकीत जय श्रीराम चा नारा देत आनंद घेतला. सर्वांनीच भारत मातेला व क्रांतिकारक शहीदांना वंदन केले. मात्र.. क्रांतिकारकांच्या फलकांमध्ये संभाजी भिडे व नथुराम गोडसे यांचे फोटो झळकल्याने तो चर्चेचा विषय ठरला. बघ्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. खरंतर यापूर्वी अमळनेर मध्ये याच विषयावर वाद झाला असताना त्याची पुनरावृत्ती दिसून आली.
- अन्न, पाणी सुविधा देऊन जपली सामाजिक बांधिलकी…
- मंगळग्रह सेवा संस्थेने विविध सामाजिक उपक्रम राबवित नावलौकिक प्राप्त केला आहे. यावेळी सर्व गणेश भक्तांना थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोलीस बांधवांची धावपळ लक्षात घेऊन त्यांचेसाठी तीन दिवस नाश्ता, चहा, जेवणाची सोय करुन सामाजिक बांधिलकी जपली. गरजू गणेशभक्तांनी देखील अन्नदानाचा लाभ घेत आयोजकांना धन्यवाद दिले.
यावेळी शहरातील मान्यवरांनी दगडी दरवाजा बाहेरील कार्यक्रम स्थळी मंचावर भेट देऊन उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. तीन दिवस सुरु असलेल्या या उपक्रमास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार बी. एस. पाटील, प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा सुलोचना वाघ, सौ. माधुरी पाटील, बापू वाणी, नाना धनगर, निरज अग्रवाल, सुभाष चौधरी, विजय माहेश्वरी, एस. डी. देशमुख, डॉ. शशिकांत सोनार, भाऊसाहेब देशमुख, दिलीप सोनवणे, योगेश मुंदडा, अग्रवाल, ॲड. शशिकांत पाटील, प्रा. अशोक पवार, रियाजभाई मौलाना, के. डी. पाटील, गोकुळ बोरसे, विजय पवार, लालचंद सैनानी, मुख्तार खाटीक आदींनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. उपक्रम यशस्वीतेसाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांचे मार्गदर्शनाखाली व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष उमेश काटे, मंगळ ग्रह संस्था व व्हॉईस ऑफ मीडिया चे सर्व पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.