
- वेब मीडिया टीम : अमळनेर
अमळनेर प्रतिनिधी ( संजय सूर्यवंशी ) : उत्तर प्रदेश व राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्राचे डिजिटल मीडिया धोरण जाहीर करुन राज्यातील डिजिटल पत्रकारांना रोजगार उत्पन्नाची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत व विधीमंडळ अधिवेशनात जाहीर केल्यानुसार वृध्द पत्रकारांसाठी असलेली पत्रकार सन्मान योजनेची रक्कम दरमहा २० हजार करण्याबाबत डिजीटल मीडीयाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ठिकठिकाणी निवेदन देण्यात येत आहेत. अमळनेर येथील डिजीटल मीडीयाचे तालुकाध्यक्ष ईश्वर रामदास महाजन, सचिव संजय सूर्यवंशी व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व यांना आज ईमेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. एक पत्र अमळनेर विधानसभेचे नामदार अनिल भाईदास पाटील
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व समाज घटकांसाठी अनेक योजना राबवून इतिहास घडविल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन ! लाडक्या बहिणीपासून अगदी रिक्षा व टॅक्सी चालकांपर्यंतच्या विविध घटकांसाठी आपण अनेक योजना राबविल्या आहेत. महानगरातील झोपडपट्ट्या उच्चभ्रू वर्गापासून ते थेट राज्यातील वाड्या-वस्त्यांवर प्रभावीपणे पोहोचलेल्या डिजिटल मिडिया पत्रकारांकडे मात्र आपले दुर्लक्ष झाले आहे. देशातील अनेक राज्यांनी आपले डिजिटल मीडिया धोरण जाहीर करुन डिजिटल पत्रकारांना दिशा दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांनीही दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी उत्तर प्रदेशचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करुन तिथल्या डिजिटल मीडियाला आधार दिला. आपण राजस्थान व उत्तर प्रदेशच्या धर्तीवर त्यापेक्षाही व्यापक धोरण युध्दपातळोवर जाहीर करुन त्याची अंमलबजावणी करावी, अशी आमची आपणाकडे आग्रही मागणी आहे. तसेच विधीमंडळ अधिवेशनात सरकारने जाहीर केल्यानुसार वृध्द पत्रकारांना तातडीने दरमहा २० हजार रुपये सन्मान मानधन सुरु करावे. आमच्या मागण्या मान्य करुन राज्यातील पत्रकारांना आधार द्यावा असेही निवेदनात म्हटले आहे.