राजमुद्रा फाउंडेशन, अमळनेेर तर्फे ‘जागर लोकशाहीचा’ कार्यक्रम; पत्रकारांशी साधला संवाद
अमळनेर : लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात पत्रकारिता हे आज गुळगुळीत वाक्य बनले आहे. नितीमान माणसाला पत्रकारांचा आधार असतो. गणेशोत्सव काळात पत्रकारांनी जनतेला नागरिक बनवले.. मतदार नव्हे. पत्रकारांनी आपल्या कार्यातून हे दाखवून दिले. सध्याचे राजकारणी फक्त ‘मतदार’ या नजरेतून लोकांकडे बघत असतात. पत्रकार हे आपल्या लेखणीतून सातत्याने लोकांना तुम्ही या देशाचे नागरिक असल्याची जाणीव करून देत असतात यामुळे सर्वसामान्य नितीमान लोकांना पत्रकारांचा आधार असतो. पत्रकारितेची सर्व पातळीवर मोठी ताकद असते. प्रश्न विचारणे गैर नसून ते पत्रकारांचे काम आहे असे मत इतिहास अभ्यासक तथा प्रमुख वक्ते प्रा. डॉ. लिलाधर पाटील यानी व्यक्त केले. येथील राजमुद्रा फाऊंडेशन तर्फे नर्मदा रिसॉर्ट येथे ‘जागर लोकशाहीचा’ ‘महाराष्ट्र धर्म जागवू या.. महाराष्ट्र धर्म वाढवू या’ विषयावर नुकतेच रविवार दिनांक २२ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेेर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष समाधान मैराळे उपस्थित होते. राजमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातीला आईसाहेब राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. आयोजक श्याम पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे वैचारिक पुस्तक भेट देऊन स्वागत केले.
प्रा. लिलाधर पाटील पुढे म्हणाले की, पत्रकारांची भूमिका लोकशाही टिकवण्याची असली पाहिजे. पत्रकाराने आवश्यक तेथे प्रश्न विचारले पाहिजे. पत्रकारांनी भूतकाळात ते काम सातत्याने केले व आजही अविरतपणे करीत आहेत. हे सांगताना काही दाखलेही दिले. आणीबाणीच्या काळात दिल्ली युनिव्हर्सिटीला आंदोलन सुरु होतं. इंदिरा गांधींच्या वडिलांचं नाव त्या युनिव्हर्सिटी ला होतं. स्व. इंदिरा गांधी यांना लोकशाही धोक्यात असताना जेएनयु च्या गेटवरच सिताराम येंचुरी यांनी त्यांना प्रश्न विचारले व त्यांना ठणकावून सांगितले की, जरी हे विद्यापीठ तुमच्या वडिलांच्या नावाचे असले तरी आम्ही तुम्हाला गेटच्या आत येऊ देणार नाही. यावर त्या पत्रकारांचा आदर राखून त्या गेटवरूनच परत निघाल्या होत्या. आज हेच प्रश्न विचारले तर देशद्रोही म्हणून घोषित केले जाते. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्राउंड लेव्हलला हे पत्रकारच करू शकतो कारण तो समाजाचे प्रश्न मांडत असतो पत्रकारांच्या लेखणीत समाज व राजकीय व्यवस्था बदलण्याची ताकद असते. पत्रकारांनी आवश्यक तेथे आवाज उठवल्यास योग्य वेळी त्यांना पाठिंबा देणारी यंत्रणा असावी. राजश्री शाहू महाराजांनी अशी यंत्रणा त्याकाळी अस्तित्वात असलेल्या पत्रकारांना दिली होती. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः एक पत्रकार होते. लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी लिखाण केले. छत्रपती शाहू महाराजांनी आवाज उठविणाऱ्या पत्रकारांना नेहमीच साथ दिली. टिळकांनी शाहू महाराज हे कसले राजे ? ते राजे नसल्याचे अग्रलेखातून लिखाण केले. तरीही टिळकांना जेव्हा छपाईसाठी पैशाची गरज होती तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी टिळकांना मदत केली. छपाईसाठी आपले साहित्य आमच्या कडे पाठवा आम्ही छपाई करुन पाठवतो सांगितले. यावर टिळकांच्या साथीदारांनी साहित्य मागवून इंद्रायणीत तर नाही बुडणार ? असा सवाल उठवला. पण टिळकांचा ठाम विश्वास होता. पूर्वी झालेल्या गोष्टीचा टिळकांना पश्चात्ताप झाला. शाहू महाराज न्यायी राजा असल्याचे त्यांनी आपल्या साथीदारांना सांगितले. त्यावेळी शाहू महाराजांनी २५ हजाराची मदत केली. टिळक, आगरकर यांना महात्मा फुलेंनी देखील सहकार्य केले. पत्रकारितेची सर्व पातळीवर मोठी ताकद असते. प्रश्न हे विचारले गेले पाहिजे प्रश्न विचारणे गैर नाही. जर हे प्रश्न विचारले गेले नाही तर लोकशाही धोक्यात येऊ शकते, पुढची पिढी बरबाद होऊ शकते. प्रश्न विचारण्याची परंपरा ही आपल्या संस्कृतीमध्येच असल्याचे दाखले त्यांनी भूतकाळातील विविध घटनांतून स्पष्ट केले. सध्याच्या शासकीय धोरणामुळे समाजात निर्माण होणाऱ्या प्रश्नावर समस्यांवर वास्तववादी दाखलेही त्यांनी यावेळी दिले. अनेक बँका, पतपेढी बंद वा विलिनीकरण करून फक्त १० बॅंक ठेवायचा विचार सुरु आहे. आपण उत्पादन व्यवस्था निर्माण केली पण त्या उत्पादित मालाची योग्य अशी विक्री व्यवस्था निर्माण करु शकलो नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. समाजाभिमुख समस्यांवर प्रश्न विचारणे गैर नाही ते पत्रकारांचे काम आहे. प्रश्न विचारायला मनाई केली तर तो गुलाम होतो. परंपरेला अनुसरुन लोकशाही बळकट करु या असा संदेश दिला.
मनोगत व्यक्त करताना व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे म्हणाले की, आजचा हा कार्यक्रम म्हणजे विचारांची मेजवानी आहे. लोकशाही प्रबळ होण्यासाठी असे कार्यक्रम होणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही प्रबळ होण्याकरिता जे काही कार्य केले. त्यात काही फेरबदल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते. अशावेळी लोकशाही वाचवण्यासाठी जागर करावा लागेल. त्यासाठी पत्रकारांच्या माध्यमातून जागर लोकशाहीचा असा जो एक वेगळा उपक्रम आयोजित केला या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. अमळनेर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी होत असलेला हा स्वतंत्र चांगला उपक्रम आहे. आम्ही पत्रकार खारीचा वाटा उचलत आहोत. जागर लोकशाहीचा होईलच तत्पूर्वी ‘अमळनेर धर्म जागवू या..’ सांगत आम्ही सर्व पत्रकारांनी गणेशोत्सव काळात आमचा धर्म पाळला आहे. अनेकांनी संयमी वृत्तांकनाबद्दल सर्व पत्रकारांचे कौतुकही केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष समाधान मैराळे यांनी लोकशाहीचा जागर करण्यात पत्रकारांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.
श्याम पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सामाजिक कार्य करीत असताना बळीराजा शिवार फेरीचा मला फायदा होतोय. या बळीराजा शिवार फेरीत मला अनेक माणसं, समाज वाचता आला. पुरातन किल्ले, मंदिरे आढळली जी कधी माहीत नव्हती. प्राप्त माहितीनुसार पुरातन वास्तू संवर्धन उपक्रम राबवता येऊ शकतो. अनेक खेडेगावांत मुख्य प्रवेशद्वार आहेत पण तेथे आरोग्य, शिक्षण, रस्ते सारख्या सुविधा नाहीत. हे पाहून मन अस्वस्थ होऊन जाते. अशा सर्व जनतेच्या प्रश्नावर, लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजेत. भविष्यात आपली अशीच साथ द्या अशी अपेक्षा करुन उपस्थितांचे आभार मानले. दर्पण वाघ यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयाराम पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजमुद्रा फाऊंडेशनचे सर्व शिलेदार यांनी परिश्रम घेतले.