
अमळनेर : धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमातीचे एसटी आरक्षण मिळावे यासाठी माऊली हळणकर, दिपक बो-हाडे, यशवंत गायके, विजय तमकर, गणेश केसकर, योगेश धरम हे दिनांक ९ सप्टेंबर २०२४ पासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने महाराष्ट्रात धनगर समाजात तीव्र असंतोष आहे. उपोषणाला अमळनेर येथील सकल धनगर समाजाने आपला पाठिंबा दिला आहे.
धनगर व धनगड एकच असून १९५६ च्या एसटी यादीत महाराष्ट्राच्या अनु. जमाती यादीत अनुक्रमांक ३६ वर धनगड आल्याने धनगर जमात त्यांच्या संवैधानिक हक्कापासून गेली ६८ वर्षांपासून वंचित आहे. वास्तविक धनगड नावाची जमात जगात कोठेही अस्तित्वात नाही. महाराष्ट्र सरकारने मा. मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा लेखी लिहून दिले आहे. तात्काळ महाराष्ट्रात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे एसटी प्रमाणपत्र देण्यात यावे. धनगर समाजास न्याय द्यावा यासाठी बन्सीलाल भागवत- राज्य उपाध्यक्ष मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र, हरचंद लांडगे- माजी शहराध्यक्ष भाजपा, एस. सी. तेले- तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल, रमेश शिरसाठ- अध्यक्ष हमाल मापाडी संघ अमळनेर, गोपीचंद शिरसाठ- तालुकाध्यक्ष मौर्य क्रांती संघ अमळनेर, विजय मोरे- संघटक, जितेंद्र भालेराव- युवक उपाध्यक्ष यांनी भेट देऊन आरक्षण मिळावे अशी मागणी केली. तसेच उपोषणकर्त्यांना काही झाल्यास महाराष्ट्रात उग्र आंदोलन छेडले जाईल. यापुढे जेलभरो आंदोलन करणार असा इशाराही दिला आहे.
