सानेगुरुजी वाचनालय येथे निवृत्त डीवायएसपी सुनिल नंदवाळकर आणि दिलीप सोनवणे यांचा झाला सत्कार
अमळनेर : आपण सानेगुरुजींचा उदो उदो करतो तरी कशाला ? असा प्रश्न करत आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. आपण किती काळ जगू यापेक्षा कसे जगू ? हे जास्त महत्त्वाचे असते. असे मत मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी व्यक्त केले. येथील पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालय तर्फे काल दिनांक २ आक्टोबर रोजी पोलीस विभागाचे डीवायएसपी सुनिल नंदवाळकर आणि सेंट्रल बँकेतील दिलीप सोनवणे यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते. सोबत विचार मंचावर नोबेल फाऊंडेशनचे जयदीप पाटील होते. उपस्थित मान्यवरांचे हस्ते सत्कारमूर्ती डीवायएसपी सुनिल नंदवाळकर आणि दिलीप सोनवणे यांचा सपत्निक शाल, बुके व भेटवस्तू देऊन अध्यक्ष डॉ महाले यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालय तर्फे डॉ. डिगंबर महाले व जयदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त प्रतिमा पूजन झाले. ‘जय जय महाराष्ट्र माझा..’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डॉ. महाले पुढे म्हणाले की, जो मनाचा सच्चा असतो.. त्यावर परमेश्वर देखील मेहेरबान असतो. तुम्ही आयुष्यभर केलेलं काम बोलत असतं तेच आज दोन्ही सत्कारमूर्तींना लागू आहे. आपले कार्य समाजात अखंडपणे सुरु ठेवा. समाजासाठी वेगळं काही करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. निवृत्ती पर्यंत जे काय पेरले ते उगवते, त्याचेच हे फलित असल्याचे सांगून दोन्ही सत्कारमूर्तींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जयदीप पाटील म्हणाले की, पोलीस प्रशासन ईच्छा असूनही गुन्हेगाराला मारु शकत नाही. काही लोकांना तो भ्रम झाला आहे. पोलीसांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदल. खरं तर गुन्हेगार ठरवण्याचा न्यायालयाला अधिकार आहे. पोलीसांना ईच्छा असूनही चांगल्या वातावरणात राहता येत नाही. आत्म्याने आत्म्याला तारले आणि येथे पाठवले. कोणीही जन्मतः गुन्हेगार नसतो तर त्यावेळची परिस्थिती गुन्हा करायला भाग पाडत असते.
बॅंकेतली आणि कंडक्टर ची नोकरी म्हणजे दिवसभर हातात पैसाच पैसा असतो. पण कामावरून बाहेर पडताना खिसा रिकामा करुनच बाहेर पडावे लागते. तेथे नोकरी करणारा व्यक्ती देशाचा अर्थ Economy सैनिक असतो. काही माणसं बहुगुणी असतात पण विकास कसा करायचा ? हेच कळत नाही. देशाचे पहिले पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी कमी कार्यकाळात चांगले काम केले. सरकारी तिजोरीतील एकही पैसा स्वतः वापरला नाही.असा पंतप्रधान होणे नाही. मनुष्याने आयुष्यात कर्मयोगी असायला हवे तरच सत्कार होतो. महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री कर्मयोगी होते म्हणून आज ते पूजनीय आहेत. त्यांना आधी घामाच्या धारा होत्या आज फुलांच्या माळा आहेत. असंच काम आजच्या दोन्ही सत्कारमूर्ती नी करावं.. एक चळवळ उभी करुन त्या चळवळीत लक्ष घालावे. माणूसकी ची भिंत दृढ करु या.. अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्काराला दिले उत्तर …
- निवृत्त डीवायएसपी नंदवाळकर म्हणाले, मी चांगला की वाईट हे परमेश्वराला माहीत. पण माझ्या सत्काराला तोलामोलाचे अध्यक्ष लाभले. नोकरी काळातील सन १९९३ चा व कोरोना काळातील अनुभव सांगताना ते भावनाविवश झाले होते. प्रत्येक वेळी मला माझी ज्ञानेश्वरी वाचवते असंही ते म्हणाले. समाजसेवा ठरवून होत नसते तर समोर आलेल्या प्रसंगासाठी काय करता ? तीच खरी समाज सेवा असते. तुमचे संस्कारच तुम्हाला समाज सेवा करायला लावतात. म्हणूनच लहान पणापासून बाळकडू मिळाले पाहिजे. नास्तिक असला तरी सद्विचार महत्वाचे असतात. आजच्या तरुणाईचे काय दिवस आलेत. आपल्या मुलांवर आपला ताबा राहिला नाही अशी स्थिती आहे. आई वडिलांच्या मृत्यूसमयी मला हजर राहता आले नाही हे दुर्भाग्य मला नेहमीच बोचते. यामुळे निवृत्ती काळात वृध्दांसाठी आईवडील समजून केअरटेकर म्हणून काम करावयाचा मानस असल्याचे सांगितले.
- बापाने लावलेली सवय मला कामी आली.. शिस्त पाळली. यामुळे नोकरीचे ठिकाणी कधी नियमबाह्य वागलो नाही. सत्तांध लोकांवर सत्य तेच लिहीतो व बोलतो असे सत्काराला उत्तर देताना दिलीप सोनवणे यांनी सांगितले.
भाऊसाहेब देशमुख म्हणाले, आरसा खोटं बोलत नाही यामुळे गुणी लोकांची साथसंगत करावी असे सांगत दोन्ही अधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच दयाराम पाटील यांनीही आपल्या मनोगतात काही जण ‘मजबूरी का नाम… गांधी’ असा शब्दप्रयोग करतात. अशांना महात्मा गांधी यांचं कार्य मोठे आहे अशी जाणीव जयंती निमित्त करुन दिली. यापुढे ‘मजबूती का नाम… गांधी’ म्हणणे उचित ठरेल असा सल्ला दिला. याप्रसंगी स्पर्धा परीक्षेतील काही गुणवंत विद्यार्थी व प्रशिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी डीवायएसपी सुनिल नंदवाळकर यांच्या जीवनावर आधारित विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विजयसिंग पवार यांनी केले. याप्रसंगी प्रा. एस. आर. चौधरी, एस. डी. देशमुख, भाऊसाहेब देशमुख, पत्रकार बांधव यांचेसह अनेक जण उपस्थित होते.