जळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संदीप घोरपडे यांनी केले नेतृत्व ; सर्व जाती-धर्म एकत्र आणून दिला विचार
अमळनेर : देशातील सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व विचारांचा लेखाजोखा मांडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने गांधीजींच्या कार्याचा जनमानसापर्यंत संदेश पोहोचावा यासाठी एक दिवसीय उपवास कार्यक्रमाचे आयोजन करण्यास कार्यकर्त्यांना आदेश दिला. तो आदेश शिरसावंत मानत जळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी जयंतीदिनी शहरातील साने गुरुजी पुतळ्या जवळ अमळनेर तालुका काँग्रेसने सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक दिवशीय उपवासाचे आयोजन करण्यात आले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अमळनेर तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, कॉंग्रेस प्रेमी, पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. यावेळी तरुणाई, महिला, शेतकरी, कष्टकरी, विविध धर्मातील धर्मप्रमुख या सर्वांना आमंत्रित करुन आपण त्यांना मुक्तपणे त्यांच्या भावना मांडण्यास संधी देण्यात आली. अनेकांनी आपापल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. हजारो नागरिकांनी या उपवास स्थळाला भेट दिली. तत्पूर्वी अमळनेर तालुका काँग्रेस च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. यात प्रामुख्याने निवृत्त केंद्रप्रमुख भागवत गुरुजी, हिम्मत गुरुजी, प्रा. अशोक पवार, बोरसे सर यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संदीप घोरपडे म्हणाले की, फैजपूर येथे कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन झाले. सर्व विचार काँग्रेसला आवडले आणि काँग्रेसने सेवा दलाची स्थापना केली. कालांतराने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साने गुरुजींना या देशाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. म्हणून साने गुरुजींनी आपला देह झिजवला. ही साने गुरुजींची मोठी देण आहे. सेवा दल राजकारण विरहित राजकारणातली विंग आहे पण ती राजकारण विरहित आहे. सेवादल एक काँग्रेस संघटन बांधण्याचे काम करतात. काँग्रेसमध्ये राजकारण करण्याचं काम सेवा दल करत नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षामध्ये सेवा दलाला पहिला मान आहे. काँग्रेसचे कुठे अधिवेशन असेल तर काँग्रेसचं झेंडावंदन होतं. तिथे सेवा दलाचे कार्यकर्ते टोप्या घालून जातात. मानवंदना देतात आणि मग पुढे ते अधिवेशन सुरू होतं. सेवा दलाचं मूळ आपल्या अमळनेर ला आहे. साने गुरुजींचा तो धागा मला सापडला म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. देशभरातील मुस्लिम समाज आज भयग्रस्त आहे देशातील वातावरण अतिशय बिकट होत आहे. आज आम्ही ७५ वर्षांपासून गुण्या गोविंदाने जगतोय पण आमच्या मध्ये संशय निर्माण केला गेला. काँग्रेसचे कार्यकर्ते निष्ठेने काम करीत आहेत. ज्यांनी कधीच धर्माधर्मात भेदभाव केला नसल्याचे सांगितले. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रींनी समता, एकतेचा आणि सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाण्याचा जो विचार दिला तो विचार पुनश्च एकदा समाजाने अंगिकारावा. महात्मा गांधी यांचे विचार पुनर्जीवित करण्यासाठी काँग्रेसतर्फे गांधीजींच्या स्मरणात एक दिवसाचा उपवास करत तोच धागा पकडून आपण जनतेमध्ये पुन्हा एकदा जागृती आणावी आणि या विचाराला पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
श्री बन्सीलाल भागवत गुरुजी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींची जयंती निमित्त विनम्र अभिवादन करुन सेवा दल म्हणजे गांधीजींची विचारधारा असल्याचे सांगितले. सेवा दलाचे लोक चांगल्या विचारांना, चांगल्या कार्याला प्राणपणाने लढण्याचं काम करतात. लालबहादूर शास्त्रीं जवळ पैसा नव्हता. आपल्याला जे मानधन मिळतं त्या मानधनातून दर महिन्याला ७० रुपये शिल्लक राहतात हे कळल्यावर शास्त्रीजींनी संसदेत जाऊन माझे ७० रुपये कमी करून टाका असे सांगितले. शास्त्रीजी असे सांगणारे देशाचे काँग्रेसचे पंतप्रधान होते. आज भौतिक वाद नाचायला लागला त्या काळात संस्कार वाचत होते. म्हणून भौतिक काळात आपल्या साऱ्यांना घराघरात जावं लागेल, रस्त्या रस्त्यावर जावं लागेल, रस्त्यावर आडवावं लागेल, उतरावं लागेल आणि काँग्रेसचा विचार घराघरात, राज्यात, देशात पोचवावा लागेल. विशेषतः तरुणांचे मन गढूळ करण्याचं वातावरण या जातीयवादी शक्तीने केले. पुन्हा एकदा आणि संस्थेचा विचार देण्यासाठी हे कुठेतरी एक पहिलं पाऊल घोरपडे सरांच्या माध्यमातून सुरू केले. निश्चितपणे आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. अदृश्य शक्ती समाजामध्ये, जनतेमध्ये असं काही विष पेरण्याचं काम करीत आहे. देशाचं काय होईल ? असं आपल्याला वाटतं. ज्यावेळेला गांधीजींनी स्वातंत्र्यसंग्राम सुरू केला होता. साऊथ आफ्रिका मधून गांधीजी आले. नागरिकांमध्ये जागृती निर्माण करुन चळवळ सुरु केली आणि बघता बघता ही चळवळ एक लोकचळवळ झाली. आपल्याला १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. दीडशे वर्षे इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं होतं सगळ्यांना एकत्रित करुन जनतेमध्ये स्वातंत्र्यासाठी भूक निर्माण करणे या सगळ्या गोष्टींना गांधी व लालबहादूर शास्त्री यांचेसह अनेकांनी विचार लोकांमध्ये रुजवला नंतर एक लोकचळवळ उभी राहिली. त्याचे फलित म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणून आपण महात्मा गांधींना देशाचा राष्ट्रपिता मानले. आज महात्माजींचा विचार तळागाळात पोहचवून खऱ्या अर्थाने समतेचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार आहे. ज्यावेळी आपण या गोष्टी जनमानसात रुजवू तेव्हाच खऱ्या अर्थाने या दोन्ही नेत्यांना श्रद्धांजली ठरेल असेही स्पष्ट केले.
आर्थिक क्षेत्रातील तज्ञ बोरसे सर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने मांडला. ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी, उद्योग क्षेत्रातला उद्योगाला उभारी देणारा कामगार, शेतीप्रधान देशांमध्ये शेती उत्पन्नावर आधारित एकूणच इतर व्यवसाय असताना शेतीमालाला न मिळणारा हमीभाव, कर्मचारी वर्गाला जुनी पेन्शन न मिळाल्याने त्यांच्यामध्ये पसरलेली नाराजी आणि अत्यंत अल्प उत्पादन क्षेत्रांमध्ये उद्योगित जो छोटा व्यापारी वर्ग आहे त्याच्या समस्यांचा पाढा वाचला व आपली आर्थिक स्थितीत होणारी अधोगती विषद केली. श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत आहेत. महिला निर्भयपणे कधी फिरणार ? असा चांगला आणि ज्वलंत असा प्रश्न आहे. अनेक माध्यमांनी, समाजसेवी संस्थांनी, पक्षांनी यावर आवाज उठवला आहे. शेतकरी बांधवांसाठी हमीभावाचा तपास नाही. स्वामीनाथन आयोगाची जी माहिती ऐकतोय आणि त्याचा जो हमीभाव आहे तो कोणालाच मिळत नाही. शेतीमाल खरेदी करणाऱ्या शासकीय संस्था, व्यापारी यांच्यावर गुन्हे का दाखल करत नाही ? इलेक्शन आलं की तोच शेतकरी आठवतो. शेतकरी समृद्ध झाला तर तो कोणाही पक्ष, आमदार, नामदार, खासदार च्या मागे जाणार नाही. तो तसाच आर्थिक दृष्ट्या अपंग असला पाहिजे आणि तो आपल्या मागे फिरला पाहिजे असे राजकीय पुढाऱ्यांना वाटते असेही मत बोरसे यांनी परखडपणे मांडले. आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी अजून संधी मिळाली तर मी भारतीय अवश्य अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकेल असेही त्यांनी आश्वासित केले.
गावरान जागल्या सेना चे अरुण देशमुख यांनी शेतकरी नैसर्गिक आपत्ती व मालाला हमीभाव मिळत नसल्याने मेटाकुटीला आला आहे. हे सांगताना शेतकऱ्यांच्या वास्तव स्थितीची अभ्यासपूर्ण मांडणी केली. सोबत गावरान जागल्या सेना चे कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रश्न मांडत असताना मनिपुर ते बदलापूर असा जो प्रवास झालेला आहे. यावर बोलताना तिलोत्तमा पाटील, वसुंधरा लांडगे, शबाना शेख यांनी अशा घटनांपासून महिलांचा बचाव करण्याकामी पुरुषांनाही पुढाकार घ्यावा लागेल असे सांगितले. सर्व भूमिका विशद करताना आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. अनेकांनी न भिता खुलेपणाने आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन अथवा विरोध याचाही उहापोह केला.
प्रा. अशोक पवार म्हणाले की, आत्मचिंतनासाठी प्रवृत्त करायचं असतं. ज्या गोष्टींची अंमलबजावणी आपण करत नाही ते आत्मचिंतन असतं. आपण नेमकं कशासाठी जगतोय आणि मी आतापर्यंत नेमकं काय मिळवल ? आपण आज जे काही आहोत ते आपल्या निर्णयामुळे आहोत. त्यामुळे आत्म चिंतनाच्या माध्यमातून आपण काहीतरी निर्णयापर्यंत आलं पाहिजे. निर्णयानंतर आपण कृतीपर्यंत आलं पाहिजे आणि ती कृती एकट्याने करायची नाही. एकट्याने कृती केली तर मर्यादा येत असल्याने ती कृती सर्वांनी मिळून करायची. ज्या वेळेला सर्व लोक एकत्र येऊन कृती करतात त्यावेळेला समाजामध्ये परिवर्तन होतच असते. स्वातंत्र्यासाठी सगळे लोक एकत्र आले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वर्षे, पिढ्या खपल्या. स्वातंत्र्याचा हा विचार पुढच्या पिढीने सोडला नाही आणि त्यामुळे आपल्याला आज स्वातंत्र्य उपभोगता येतं. ज्या महापुरुषांची आपण नावे घेतो ती नावं त्यांच्या विचारांमुळे घेतो. त्यांचे विचार हे सर्वसामान्य माणसाला बळ देणारे असतात आणि सर्वसामान्य माणसे या देशांमध्ये मोठ्या संख्येने असल्यामुळे आपण पुष्कळ वेळा बहुसंख्य लोकांचे प्रश्न सोडून देतो आणि त्यामुळे देशांमध्ये परिस्थिती निर्माण होते. पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. कार्यक्रमाची संख्या भविष्यामध्ये वाढवावी लागेल त्याचे स्वरुप पण जरा बदलाव लागेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असूनही लोक मनातलं बोलत नाहीत. जरा बॅलेंसिंग असेल अशाप्रकारे बोललं लिहिलं जातं. तसाच अनेकांचा कल असतो. त्या बॅलन्सिंगमुळे पुष्कळ वेळेला आपला हक्क आपण गमावून बसतो. ज्यांनी समाजासाठी गरिबांसाठी दलितांसाठी अल्पसंख्याकांसाठी त्यांनी आपलं जीवन अर्पण केले, स्वतःच्या करिअरचा विचार नाही केला त्यांचे फोटो पूजले जातात हे आपण लक्षात घ्या. आपल्याकडे करिअर म्हणजे दोन पैसे मिळवणे. या पैशांच्या मस्ती मुळे सत्तेची मस्ती येते. सत्तेच्या मस्तीतून परत पैसा मिळवून परत सत्ता काबीज केली जाते. त्यामुळे आता कार्यकर्त्याचे, संघटनेचे महत्त्व राहिलेले नाही. डायरेक्ट जनता तू नेता समीकरण झाले आहे. निवडणुकीत मतदारांना पैसे द्यावे लागतात. पाच वर्षांनी आम्ही तुमच्यापर्यंत येऊ तुम्हाला आम्ही पाच वर्षासाठी पाचशे रुपये देऊ. पैसे दिल्यावर मत द्यायचं मात्र प्रश्न आणायचे नाही असा करार होऊन व्यवहार संपतो. साहजिकच गरीब लोक आपले प्रश्न त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही आणि त्या गरिबांची काम करायची नाही अशा प्रकारची मानसिकता पाहायला मिळते आहे. अशी हिम्मत होतेच कशी ? याचा पण विचार आपल्याला करावा लागेल कोणत्या विचारांच्या बाजूने आहोत हे जरी खरं असलं तरी या विचारांच्या विरोधात आहोत हे पण स्पष्ट झालं पाहिजे. म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रश्न विचारा, असे आवाहन उपस्थितांना केले.
ग्रामीण भागातून दहा भजनी मंडळांनी हजेरी लावून तुकाराम महाराजांच्या भागवत धर्माची पताका कशा पद्धतीने विविध जाती धर्माला सोबत घेऊन जाणारी आहे अशी भजने, भारुडे, गवळणी सादरीकरण केले. याचबरोबर समाजकार्य महाविद्यालयातील अमळनेर व चोपडा येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण करुन भारत देश हुकूमशाही कडे कसा प्रवास करीत आहे हे आपल्या अभिनयाच्या व प्रबोधन गीतांच्या माध्यमातून संदेश दिला. संध्याकाळी पाच वाजता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम बापू व लोटन चौधरी यांच्या हस्ते सरबत घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.