जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, फिनिक्स सोशल ग्रुप तर्फे ‘गर्ल्स प्रोटेक्टिव मिशन’ विषयावर झाली पत्रकार परिषद
अमळनेर : महाराष्ट्रात बदलापूर, गोंडगाव, जवखेडा येथील मन हेलावून टाकणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबरोबरच अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मुली, महिला रस्त्यावरच काय.. घरात, शाळेत, समाजात देखील सुरक्षित नाहीत. त्यांना जगण्याचा अधिकार नाही का ? समाजात वावरताना त्यांना सुरक्षा कुठे मिळेल ? हा मोठा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, फिनिक्स ग्रुपच्या माध्यमातून ‛गर्ल्स प्रोटेक्टिव्ह मिशन’ अंतर्गत शहर व तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयांत टीम सोबत जाऊन मुला मुलींना मार्गदर्शन करीत असल्याचे ग्रुपच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सोबत सौ. वसुंधरा लांडगे, लताताई पाटील, डॉ. प्रतिभा मराठे उपस्थित होत्या. याशिवाय प्राचार्य आशिष शर्मा देखील टीम सोबत काम करीत असल्याचे सांगितले.
निर्भया हत्याकांडा नंतर पोस्को सारखा कडक कायदा होऊनही महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी अशा अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी दिनांक १० मार्च २०२२ ला शासन निर्णया ने अनिवार्य केले की संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांनी सखी सावित्री समित्यांची स्थापना करावी. त्याप्रमाणे शाळांनी अशा विषयांचा निपटारा करण्यासाठी समित्या गठीत केल्या. या माध्यमातून दर सहा महिन्यांनी सुरक्षा शिक्षण द्यावे असे ठरले होते. मात्र या समित्या कागदावरच राहिल्या. केवळ नवीन समित्या स्थापन करण्याची घोषणा करून मुलांच्या संदर्भातील सुरक्षेचा प्रश्न सुटणार आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सन २०२४ च्या बदलापूर घटनेने मन सुन्न झाले. सर्वत्र त्या घटनेचे पडसाद उमटले आणि पुन्हा सखी सावित्री, विशाखा समितीची आठवण होऊन शाळांमध्ये विषयांचा निपटारा करण्यासाठी समित्या गठीत केल्या जात आहेत. महिन्यापूर्वी जळगाव जिल्ह्यात राज्यपाल आले असता, फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप मार्फत मुलींना सुरक्षित आणि संरक्षित शिक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आल्याचे सांगितले. प्रत्येक शाळा, महाविद्यालयात कराटे, लाठ्या काठ्या सारखे प्रशिक्षण अभ्यासक्रमात असले पाहिजे. मुलींनी रात्री सातच्या आत घरात राहावे व मुलांनी रात्री उशिरापर्यंत पर्यंत बाहेर फिरावे हे बरोबर नाही. दोघांनाही समान न्याय मिळायला हवा. वेळेची बंधने फक्त मुलींना नको तर मुलांनाही हवीत. झाशीची राणी, आईसाहेब जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांनी देखील संघर्ष केला. त्यांचे चरित्र आत्मसात करायला पाहिजे. जयंती साजरी करुन काहीही होणार नाही. आमची दृष्टी बदलण्याची गरज आहे. समाजात येऊन बोला, तुमची मतं चौकात येऊन मांडा. तुम्ही शांत राहिला तर तुमच्यावर अत्याचार हे होणारच. स्पष्ट बोलेल तीच वाचेल. अलीकडे देवाचा प्रसाद देऊन लुबाडणूकीचे प्रकार समोर आले आहेत. कोणी असा प्रसाद दिला तर काळजी घ्यावी. धन प्राप्तीसाठी संस्थाचालकाने निष्पाप मुलाचा बळी घ्यावा ही विचार करायला लावणारी घटना घडली यासारखं पाप नाही.
पूर्वीच्या काळात देखील राक्षसांचा संहार होता. दुर्गा, महाकाली, रणचंडीका यांनी राक्षसांचा वध केला. अशा देवींची आज पूजा केली जाते. मुलीनी स्वतः संरक्षण करायला शिकले पाहिजे. दुर्गा, महाकाली, रणचंडीका सारख्या रणरागिणी बना असे आवाहन मुलींना करीत आहोत. स्वतःची सुरक्षा स्वतःला करावी लागेल. दप्तरात शस्त्र ठेवावं लागेल व गरजेचे वेळी शस्त्राचा उपयोग करावा लागेल. महिला मुलीं प्रमाणे मुलांशीदेखील चर्चा करण्याची मोठी गरज आहे. ज्याप्रमाणे गणपतीने न डगमगता आईचे संरक्षणासाठी स्वतःचे प्राणाची बाजी लावली त्याप्रमाणे मुलांनी आया बहिणींचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. विकृत विचारांमुळे अशा घटना घडत असतात. या गोष्टी मुलांच्या मनात साठवून ठेवल्या जातात. त्यांच्या मनातील न्यूनगंड काढण्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व्यक्तींनी पुढे येऊन सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
आतापर्यंत अमळनेर शहरातील इंदिरा गांधी शाळा,जय योगेश्वर व शांतिनिकेतन शाळा, जी.एस हायस्कूल, स्वामी विवेकानंद स्कूल, राजश्री शाहू महाराज हायस्कूल, लोकमान्य विद्यालय, ॲड. ललिता पाटील स्कूल, पीबीए इंग्लिश स्कूल, प्रताप कॉलेज सीनियर व ज्युनियर, पद्मावती मुंदडा हायस्कूल, न्यू मराठी स्कूल, बोहरा इंग्लिश स्कूल, समाजकार्य महाविद्यालय, गायकवाड हायस्कूल, डी. आर. कन्या शाळा, सावित्रीबाई फुले स्कूल, भगिनी मंडळ स्कूल येथे मुली व मुलांना मार्गदर्शन केले असल्याचे सांगण्यात आले. याकामी सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले आहे. यापुढेही शहरच नव्हे तर तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातून हे कार्य अविरत सुरु राहणार असून फिनिक्स अवेअरनेस ग्रुप लक्ष ठेवून असणार आहे.