गुलाबा बरोबर काटे बघून प्रयत्न करणार तरच यश दिसेल : ज्येष्ठ विचारवंत उदय निरगुडकर

मराठी वाड्मय मंडळ व र. का. केले वाचनालय तर्फे आयोजित शारदीय व्याख्यानमालेत ‘भारत काल, आज आणि उद्या’ विषयावर गुंफले प्रथम पुष्प

अमळनेर : देशाच्या प्रगतीची दिशा आणि केंद्रबिंदू चुकला होता. आजही फारशी प्रगती झालेली नाही. सन १९९८ ला उदयास आलेला आय टी उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारत असून ‘उद्याचा भारत’ प्रगती कडे पाऊल टाकतो आहे असे चित्र निर्माण झाले आहे म्हणून ज्ञान हे सर्वोत्तम आहे. गुलाबाबरोबर काटे बघून प्रयत्न करणार तर यश नक्कीच दिसेल असे मत ज्येष्ठ विचारवंत, संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठी वाड्मय मंडळ व र. का. केले सार्वजनिक वाचनालय तर्फे आयोजित शारदीय व्याख्यानमालेत प्रथम पुष्प गुंफताना ‘भारत काल, आज आणि उद्या’ या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले उपस्थित होते.

सोबत विचार मंचावर मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, कार्यवाह नरेंद्र निकुंभ होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती चे पूजन झाले. डॉ. डिगंबर महाले यांची व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी स्नेहा एकतारे यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. डॉ. अविनाश जोशी यांनी प्रास्ताविकात म्हणाले की, अमळनेरला दुसऱ्यांदा साहित्य संमेलनाचा मान मिळाला ही अभिमानाची बाब असून साहित्य संमेलनावेळी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. आपण सर्वांनी मिळून पुढेही हा वसा सुरु ठेऊ या अशी अपेक्षा व्यक्त केली. यानंतर देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.

मराठी वाड्मय मंडळाने अमळनेरची संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले…

डॉ. डिगंबर महाले यांनी आदिमाया आदिशक्ती ला प्रणाम करुन ज्यांचेकडे  शब्दभांडार आहे तेथे आपले शब्द संपतात अशा महनीय व्यक्तीकडून माझा सन्मान होणं माझे भाग्यच. चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. लबाडी फार काळ टिकत नाही. सिमेंट काँक्रीटच्या करोडो रुपयांच्या बिल्डिंग, करोडो रुपये खर्च करून उभारलेले महापुरुषांचे पुतळे सुद्धा धडाधड कोसळतात अशा वेळेला हाडामांसानी बनलेल्या लोकांचे काय ? असा प्रश्न केला. मराठी वाड्मय मंडळ सारखी संस्था जेव्हा ७५ वर्षाकडे वाटचाल करते तेव्हा त्या संस्थेत कार्य करणारी माणसंही त्यात ताकदीची आहेत. अमळनेरच्या संस्कृतीला कायम जिवंत ठेवण्याचे काम जर कोणी केलं असेल तर ते मराठी वाड्मय मंडळाने केले आहे. वेगवेगळ्या घरातून वेगवेगळ्या संस्कारातून वेगवेगळ्या शिक्षणातून आलेले लोक एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष अतिशय चांगलं आणि दृष्ट लागेल असं काम करताहेत. क्लॅश ऑफ पर्सनॅलिटी जो आहे तो प्रत्येक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात लागू असतो. कदाचित इथेही असेल पण त्यात क्लॅश ऑफ पर्सनॅलिटीच्या कणभर बाबीला यांनी कधी मणभर महत्त्व दिलेले नाही. तिथल्या तिथे वाद संपतात, बाहेर पडत देखील नाहीत. वाद होणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. संस्था दोन वर्षात ७५ वर्षे पूर्ण करणार असल्याने त्यासाठीचे नियोजन सुरू केलं असेलच. एक मुख्य समस्या असते ती म्हणजे पैशांची. तर त्याची चिंता करू नका अमळनेेर हे दानशूरांचे शहर आहे. मराठी वाड्मय मंडळाच्या सोबत जर मंगळ ग्रह सेवा संस्थेला या शहराची काही साहित्य सभा करण्याची संधी मिळाली तर तो निश्चितपणे आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल असे आश्वासित केले.
एके काळी व्याख्यानमाल्यांना बसण्यासाठी खुर्च्या नसायच्या लोकं खाली बसायचे तरी दोन दोन तीन तास बसत होते नंतर खुर्च्या आल्या. आता  खुर्च्या आहेत, हॉल पण आहेत पण लोकांची गर्दी कमी व्हायला लागली. असं असलं तरी जो प्रेक्षक येतो तो गर्दीला भारी असतो. आमचा एक प्रेक्षक लाख प्रेक्षक असं म्हटलं तरी चालेल. उदय निरगुडकर यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले, महनीय व्यक्तीने एखाद्या वृध्दत्वाकडे झुकलेल्या व्यक्ती च्या सत्कारासाठी विचार मंचावरुन खाली येणं वेगळी अनुभूती होती. अशी माणसं जेव्हा खाली उतरतात ना..! त्याच्यातून ते किती वर आहेत ते लक्षात येतं. आगामी काळात चळवळ यशस्वी होण्यासाठी मराठी वाड्मय मंडळाला शुभेच्छा दिल्या.

जेव्हा जनता ठरवते तेव्हा देश जिंकतो..जनता खचते तेव्हा हार होते.

ज्येष्ठ विचारवंत उदय निरगुडकर पुढे म्हणाले की, जी मराठी वाड्मय संस्था ७३ वर्ष काम करते ही निश्चितच उल्लेखनीय गोष्ट आहे. अमळनेरला खानदेशातलं पुणे म्हटलं जातं. तेथे शारदेचा नवरात्रोत्सव होतोय. तरुणांनी ते ऐकण्याची आवश्यकता आहे. प्रताप शेठजींच्या कृपेने अमळनेेर ला शाळा, महाविद्यालय, राम मंदिर उभारले आहे. तशीच आयटी उद्योजकता पुढे येऊ लागली आहे. भारताची ही यशाची पताका अधिक सक्षमपणे पुढे चालू आहे. भारतात अज्ञान, दारिद्रय, अस्थिरता, विषमता, अस्वच्छता आणि मागासलेपणा हे प्रश्न होते व आहेत. देशोदेशींचा प्रवास घडला. तेथे जे पाहिले यात शैक्षणिक धोरण, तेथील लोक, लोकसंख्या, साधन सामुग्री, विद्यापीठ, संसदेतील उद्योगातील निरीक्षणे सांगितली. जपानी शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गात जायच्या आधी शिस्तीचे पालन करत चप्पल बूट वर्गा बाहेर रांगेत लाऊन वर्गात प्रवेश करतात. आपल्या कडे एखाद्या देवळात गेल्यानंतर परमेश्वर भेटल्याचा आनंद जेवढा होत असेल त्यापेक्षा जास्त व्यस्त काढलेल्या चपलांमधून आपली चप्पल मिळाल्याचा आनंद जास्त होतो.  जपानमधील लोकांना देशाविषयी आदर, देशभक्ती आहे. आपल्याकडे घरात जर २०० वर्षे जुनी परंपरा पाळायला लागलो तर पुढची पिढी आपल्याला काहीसा मागास ठरवते. परंतु तिकडे देश स्वच्छ ठेवायची शिस्त आहे. आपल्याकडे भारत माता की जय म्हणणारा मुलगा जमिनीवर थुंकतो. बाहेरच्या देशात नापास विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सांघिक भावनेने प्रयत्न केले जातात. प्रत्येकाला भूकंप झाला तर काय करायचे , कसं जायचं ? याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रथम गरोदर महिला, वृद्ध महिला, तरुण महिला, वृद्ध पुरुष, मग इतर असा क्रम ठरलेला असतो. तेही सगळं व्यवस्थितपणे सुरु असतं. सारं पाहून मग विचार येतो की शिस्त , संघ भावनेचा आदर करणे, देशाविषयी प्रेम असणं अशा गोष्टी बाहेरच्या देशातून शिकावं. आपल्याकडे स्वार्थासाठी राजकारणी माणसाला जवळ केले जाते. जेव्हा जनता ठरवते तेव्हा देश जिंकतो..जनता खचते तेव्हा हार होते. इंग्रजांनी ब्रिटिशांनी १९० वर्षात ४५ लाख ट्रीलियन डॉलर मूठभर सैनिकांमध्ये लुटले. समोरचे आपल्या वादात राहीले. ५० हजारांच्या फौजेसमोर समोरच्या ३ हजारांची फौज एकजूट मुळे भारी पडली. आपल्या देशातच औरंगजेब चे थडगे  बांधले याला शिवाजी महाराजांचा मोठेपणा म्हणतात. जनतेच्या मनात देश प्रेम जागवणं म्हणजे हिंदू प्रेम.
१७ व्या शतकात जीडीपी २३ ते २५ टक्के होता. १९४७ ला ४ टक्केवर आला आणि आज ०.४ % टक्के आहे. पूर्वी शिक्षण, स्पर्धा, लायसन्स, अभिरुची सर्वच अधिकारापासून रोखून धरले होते यामुळे आपण मागे होतो.

भारताचे प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण…

कोरोना काळात इतर देशांत ४ ते ५ टक्के मृत्यू दर असताना आपल्या कडे फक्त १.१ टक्के होता. लस तयार करण्यासाठी पुण्यातील कंपनी पुढे आली. यामुळे  अनेक देशांनी पंतप्रधानांचे कौतुक केले. पण आपल्याकडे लसीचे अफलातून संशोधन असूनही अफवांना ऊत आला आणि लसीचे दुष्परिणाम सांगितले गेले. चीन ची वन चाईल्ड पॉलिसी मुळे आता चीन देश मागे पडतोय. आपला भारत प्रगतीच्या दिशेने आहे.भारतात तरुणांचा देश आहे भारताने देशी बनावटीचे अग्निबाण आणि उपग्रह निर्मिती केली आहे चंद्र आणि मंगळाच्या कक्ष अवकाशात पाठवले आहेत उपग्रहांचा उपयोग संदेशवहन हवामानाचा अंदाज खनिज आणि भोजनाचा शोध पिकांचे नियंत्रण आणि संरक्षणासाठी होत आहे संरक्षक सामग्री बरोबर क्षेपणास्त्रांची निर्मिती करून भारताने आपली संरक्षण व्यवस्था मजबूत केली आहे कोरोनात लस तयार करण्यासाठी व इतर विज्ञानाच्या सर्व संशोधनांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो या आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे देशात काम न करणारी माणसांना जनता डोक्यावर काम करणारी माणसं अजूनही पुढे आले नाहीत याची खंत व्यक्त केली.  पुण्याची प्राची शेवगावकर कोणाला माहित नाही या २३ वर्षाच्या मुलीने याच काळात आपल्या वडिलांबरोबर बसून ११० देशांचे नागरिक  रोजच्या जीवनामध्ये किती काळ उत्सर्जन करतात ते कॅल्क्युलेट करुन तसे छोटे उपकरण तयार केले. अशी प्राची शिरगावकर आम्हाला मोठी वाटत नाही. जागतिक स्पर्धेत कुठलं आरक्षण नसतं हे सांगणाऱ्या एका तरुणाने hb मोजणारे यंत्र संशोधन केले. एकाने संशोधन करुन अपंगांसाठी जयपूर फूट सारखे आर्टिफिशियल अवयव तयार केले. सफाई कामगाराच्या मुलाने रोबोट संशोधन करुन आपला बाप रोबो ऑपरेटर आहे आपला नाद करायचा नाय..! हे दाखवून दिल्याची उदाहरणे दिली. आज रेल -रोड -एअर या तीन गोष्टीत झालेली प्रगती वाटत नसेल पण भविष्यात नितीन गडकरींना आठवाल अशा शब्दात त्यांचे कौतुकही श्री निरगुडकर यांनी केले.

व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ . अविनाश जोशी, उपाध्यक्ष शामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, सोमनाथ ब्रम्हे, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शिला पाटील, स्विकृत सदस्य अजय केले, बजरंग लाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापुरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्याम पवार, भैय्यासाहेब मगर यांनी तर आभार  भैय्यासाहेब मगर यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!