ज्याचे कार्य कर्तृत्व मोठे असते त्याच्या जीवनावर पोवाडा लिहिला जातो : शाहीर शिवाजीराव पाटील

सरकार शाहीरांच्या पाठीशी उभे राहो अथवा ना राहो, पण समाज हा कलावंताच्या आजही पाठीशी.


अमळनेर : पोवाडा लिहावा मर्दाने, गावा सुद्धा मर्दाने आणि ऐकावा सुद्धा मर्दाने. पोवाडा ही गोष्ट अतिशय सोपी नाही. त्या काळातला राजाश्रय आज महाराष्ट्रातला कुठलाही शाहीर कलावंत असेल त्याला राजाश्रय हा अत्यंत तोकड्या स्वरूपात आहे. ज्यांचे कार्य कर्तृत्व मोठे असते त्याच्या जीवनावर पोवाडा लिहिला जातो. असे मोठे कार्य छ्त्रपती शिवाजी महाराजांचे आहे साहजिकच त्यांच्या कार्याचे पोवाड्यातून गुणगान केले जाते. असे मत खानदेश लोकरंग फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठी वाड्मय मंडळ व र. का. केले सार्वजनिक वाचनालय तर्फे आयोजित शारदीय व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना ‘रंग नाहीतरी कलेचा..’ या विषयावर ते भूमिका मांडत होते. प्रमुख अतिथी म्हणून के. डी. पाटील, डॉ. शरद शिंदे उपस्थित होते. सोबत विचार मंचावर मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष अविनाश जोशी, प्रा. शीला पाटील, स्नेहा एकतारे होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती चे पूजन झाले. मान्यवरांचा व देणगीदारांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप घोरपडे यांनी केले.

शाहीर शिवाजीराव पाटील पुढे म्हणाले की अमळनेेरच्या कर्मभूमीत ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्यांचा इतिहास महत्वाचा आहे म्हणजे. जीवनाला दिशा देऊन शाळा महाविद्यालय, दवाखाना निर्माण केला. संत सखाराम महाराजांची, साने गुरुजींची कर्मभूमी आहे. सुंदर असे मंगळ ग्रह मंदिर आहे. नवीन येणाऱ्या पिढीला मागचं काय महत्वाचे ? यात रस नाही, गंध नाही. त्यांच्या मनामध्ये चांगले विचार संचारण्यासाठी शाहीर पाहिजे. शाहीर शिवाय समाजाला कसं जगाव ? हे कळणार नाही. आजच्या या मरगळलेल्या, व्यसनाधीन मुलांना, विकृत मन सुदृढ कसे होईल ? यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.

पोवाडा म्हणजे नेमके काय ? हे सांगताना शाहीर शिवाजीराव पाटील म्हणाले की, लोककथेचे जे संकेत आहेत ते संकेत पण टाळता येणार नाही. संकेत काय हे सांगताना पोवाड्याला आरंभ आहे आणि पोवाडा ला अंत आहे. त्या संकेतामध्ये पण कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल तर त्यामध्ये पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होते. पोवाडा गाताना मोठी लांबलचक कथा थोडक्यात सांगायची असते म्हणून त्याचं तत्व काय आहे तर प्रत्येक गोष्ट कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त अर्थ रसिकापर्यंत पोहोचवणं हे त्याचं काम आहे. लोक कथेमध्ये, पोवाड्यामध्ये शाहीर आला. लोककथेमध्ये एक नायक लागतो आणि त्या नायकाच म्हणजे निवेदकाचं काम शाहीर करतो. तो स्वतः निवेदक बनतो म्हणजे तो नायक बनतो आणि मग तो ती कथा समजावून सांगत असताना गीतांचा आधार घेता घेता तो मध्ये मध्ये अभिनय बंद करतो. तो आवाजाच्या माध्यमातून अभिनय करतो. श्रोत्यांना धरून ठेवतो. तो आपल्या साथीदारांना प्रोत्साहन देतो एवढंच नाही तर या गायनाला नाटकामध्ये रूपांतरित करतो. एवढं सगळं काम त्या शाहीराला करायचे म्हणून तो अतिशय बहुविध भूमिका साकारतो म्हणून या संपूर्ण मंचावर मान मिळतो. गीतांमध्ये एक यमक असतो पुन्हा पुन्हा तो यमक साधला जातो आणि तो यमक साधत पहिल्या चरणातून दुसऱ्या चरणात, दुसऱ्या चरणातून तिसऱ्या चरणात, तिसऱ्या चरणातून चौथ्या चरणामध्ये शाहीर तुम्हाला घेऊन जातो. पोवाड्याचे, लोक कथेच्या या गीतांचे कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक असे प्रकार आहेत. लोक देवते विषयी कथा गीत, वीर कथांचे कथा गीत, ओवी, लघु कथा आहेत आणि या अल्प क्षणाचे तत्व तो बाळगतो आणि तुम्हा आम्हाला परिचित करून देतो. या कथेसोबत स्वतःला जोडून ठेवतो. तुमच्यासोबत कथेला गतिमान करण्यासाठी तो जलद लय पकडतो. अनेकदा पोवाडा काही लोकांच्या डोक्यावरून जातो. त्याची एक लय आहे त्या लयला स्वतःला जोडून घ्या मग तो पोवाडा समजेल. मग त्या पोवाड्याची कथा समजेल. आणखी महत्त्वाचं तत्व म्हणजे याचा ग्रामीण भाग असतो तो ग्रामीण भाषेत तुमच्या मायबोलीमध्ये तुमच्याशी पोवाडातून संवाद साधतो. गायन..वादन..अभिनयाचा संगम करत सादरीकरण करणारा शाहीर आपल्याला आपलाच वाटतो. मनोरंजन लोकशिक्षणाला सुरुवात करताना शिवाजीराव पाटील आणि सहकारी कलावंतांना अस्सल ग्रामीण लोककला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले. 

महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक घटना…

  • अमळनेर शहरात नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घडवून आणले. या कार्याला ज्यांचे ज्यांचे हातभार लागले. दुसरी गोष्ट म्हणजे अमळनेेर नगरीतून सातत्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न चालू होता. हे प्रयत्न सफल झाल्याने मायबाप सरकारचे आणि अमळनेर नगरीतील सर्व साहित्यिकांचे महाराष्ट्र शाहीर परिषद आणि खानदेश लोकरंग फाउंडेशन च्या वतीने आभार मानण्यात आले.

शाहीराला खंत एका शाहीराची… कलावंताचं दुर्दैव..

  • लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची विचारसरणी शासनाच्या विरोधात काम करत होती परंतु शाहीर आण्णाभाऊ साठे यांनी समाज जागृतीसाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवलं. वाटेगाव सोडलं आणि मुंबई गाठली. अशा शाहीराच्या म‌त्यूवेळी फक्त नऊ लोक स्मशान भूमीमध्ये नेण्यासाठी होते. हे या कलावंताचे दुर्दैव असतं. पण या समाजावर शाहीरांना विश्वास आहे सरकार शाहीरांच्या पाठीशी उभे राहो अथवा ना राहो पण समाज हा कलावंताच्या आजही पाठीशी आहे. असे सांगत आयोजकांना धन्यवाद दिले .

कार्यक्रमात प्रामुख्याने पोवाडा, गवळण, नाटिका, हिंदी -अहिराणी गीते, असून काही अपवाद गाणी वगळता हे सर्व  लिखाण शिवाजीराव पाटील यांचे स्वतःचा आहे. जय खानदेश चार नारा देत कार्यक्रमाला सुरुवात केली. ‘भारत मातेच्या शूर वीरांना..’ या गाण्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्यांना श्रध्दांजली अर्पण केली. पोवाडा गाताना भक्ती रस, वीर रस, शृंगार रस यांचा संगम असतो. सुरुवातीला खान्देश पोवाडा म्हटला. यात, खानदेशातील देवी देवता, संत, ऋषी, देशभक्त, यात्रा, नद्या, पारंपरिक सण उत्सव, किल्ले, पर्यटन स्थळे यांचा समावेश होता.

सर्व कलाकारांच्या साथीने कार्यक्रमात रंगत वाढत गेली. सुरज राऊळ या कलाकाराने सुंदर अभिनय करत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर आधारित पोवाडा गायला. कपाटे या कलाकाराने अहिराणी गीत म्हटले. मुख्य कलाकार शिवाजीराव पाटील यांनी फितुरी खंडोजीचा पोवाडा गायन केले. शिवशाही चा इतिहास या पोवाड्यातून उलगडण्यात आला. आम्हीच आमच्या घरात, सभोवताली अन्याय अत्याचार, महागाई, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, अस्वच्छता असे शेकडो प्रश्न उभे करुन ठेवले आहेत. आपणच एखादे काम करवून घ्यायचे असेल तर लाच देऊन काम करवून घेतो. पैसे देऊन लग्नाची मुलगी आणावी लागते. या पार्श्वभूमीवर एक ‘कौटुंबिक विनोदी झगडा’ ही अहिराणी नाटिका सादरीकरण करत शेवटी रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवले.या नाटिकेतून घराघरातील प्रश्न, वस्तुस्थिती मांडली. यात हुंडा, विवाह समस्या, या मुद्द्यावर प्रकाश टाकला. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कलाकारांमध्ये मुख्य शाहीर शिवाजीराव पाटील यांचेसह नामदेव सोननी, दर्शनभाऊ, रामसिंग राजपूत, जितेंद्र भांडारकर, वेदराज कपाटे, उमेश  पाटील, गोकुळ पाटील, सुरज राऊळ यांचा सहभाग होता. व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ .अविनाश जोशी, उपाध्यक्ष शामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, सोमनाथ ब्रम्हे, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शिला पाटील, स्विकृत सदस्य अजय केले, बजरंग लाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापुरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप घोरपडे, श्यामकांत भदाणे, वसुंधरा लांडगे यांनी तर आभार वसुंधरा लांडगे यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!