पारोळा येथे नवरात्रौत्सव निमित्त माळी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव; महाप्रसादाचेही आयोजन

पारोळा : येथील ऐतिहासिक नगरीत कुलदैवत श्री बालाजी महाराज व माता वैष्णोदेवी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसाद व माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थानी तामसवाडी गटाचे जि.प. सदस्य रोहन सतीश पाटील व सौ. वर्षा रोहन पाटील होते. या सोहळ्यात इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर, मेडिकल व इंजीनियरिंग या विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळालेल्या माळी समाजातील २५ विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सोबतच माळी समाजातील १५ कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यात संतोष महाजन, पी. एस. माळी, संजय माळी, वना महाजन, प्रकाश महाजन, गुलाब महाजन, बापू महाजन, धीरज महाजन, आकाश महाजन आदींचा समावेश आहे. समाज व शिक्षण प्रेमी प्रा. डॉ. रविंद्र माळी (किसान महाविद्यालय, पारोळा) व आशा रविंद्र माळी कार्यक्रमाचे आयोजक होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय तुंटे (उपप्राचार्य, प्रताप महाविद्यालय, अमळनेर व अध्यक्ष, क.ब.चौ.उमवि, जळगांव राज्यशास्त्र अभ्यास मंडळ), डॉ. गुणवंत सोनवणे (उपप्राचार्य, किसान महाविद्यालय, पारोळा तसेच क. ब. चौ. उमवि, जळगांव, रसायनशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष), प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कांबळे (मराठी साहित्याचे अभ्यासक, प्रताप महाविद्यालय,अमळनेर), समता परिषदेचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन, डॉ. शांताराम दाजीबा पाटील, चेअरमन पीपल्स एज्युकेशन सोसायटी मोंढाळे ता.पारोळा, माळी समाज पंचमंडळाचे अध्यक्ष कैलास भाऊलाल महाजन, रमेश माळी आदी उपस्थित होते.

अध्यक्षस्थानावरून बोलताना रोहन पाटील म्हणाले की, प्राध्यापक रवींद्र माळी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य समाजाला नेहमीच प्रेरणा देणारे आहे. कै.भास्कर राजाराम पाटील यांनी सुद्धा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज व आंबेडकर यांचे विचार आदर्श मानून त्याप्रमाणे समाजसेवेचे व शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य केले. आजच्या विद्यार्थ्यांनी नितीमूल्य बाळगून समाजाच्या व देशाच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असावे. याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी यशोशिखर कसे गाठावे ? याबद्दल मार्गदर्शन केले. माजी आमदार व राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी हा कार्यक्रम निश्चितच समाजासाठी उपयुक्त व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी देणारा असल्याचा संदेश दिला आहे.

डॉ. विजय तुंटे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता आज सुद्धा महत्वाची आहे. या तीन महामानवाच्या विचारामुळे भारत एक जगाची प्रबळ अर्थशक्ती बनू शकते. विद्यार्थ्यांनी या तीन महामानवाचे विचार अंगीकृत करून स्वतःला कर्तृत्ववान बनावे असा संदेश दिला. डॉ. गुणवंत सोनवणे म्हणाले की, विद्यार्थ्यांना गुणगौरव केल्यामुळे निश्चितच प्रेरणा मिळते साहजिकच यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी त्यांच्यात निर्माण होते .संतोष महाजन म्हणाले की, सोहळा म्हणजे नवरात्र उत्सव, विद्यार्थी गुणगौरव व महाप्रसाद असा त्रिवेणी संगम साधणारा मंगलमय सोहळा आहे. प्राध्यापक रवींद्र माळी व सौ.आशा माळी यांचे हे समाजासाठी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असून त्यांच्या हातून नेहमी अशी समाजसेवेचे कार्य होत राहो अशा सदिच्छा दिल्या. यावेळी वर्षाताई पाटील यांनीही गुणवंत विद्यार्थी व पालकांना माळी समाजासाठी विकासाभिमुख कार्य करण्याची ग्वाही देत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. आशा माळी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ.रवींद्र माळी यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!