शेतकरी त्रस्त.. नेते मस्त.! तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा
अमळनेर : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले असून शेतात पाणी साचून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अमळनेेर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. यामुळे सर्व महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सोमवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अमळनेर प्रांत कार्यालय आवारात शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी दिवसभर तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नागरी हित दक्षता समिती, अमळनेर यांनी केले आहे.
पाडळसरे धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करा, पीक विम्याचे पैसे त्वरित द्या, पी. एम. किसान योजनेचे पैसे त्वरित शेतकऱ्यांना द्या, सन २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे भरा, प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्य करा, ग्रामीण शिक्षण व्यवस्था व कुपोषणाकडे गांभीर्याने लक्ष द्या, ग्रामीण दळणवळण यंत्रणा सुसज्ज करा, कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन करा , नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी , संजय गांधी निराधार योजना इ. कर्मचाऱ्यांचे मानधन त्वरित द्या, जुनी पेन्शन महाराष्ट्रातील सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांना लागू करा, शेतकऱ्यांच्या मालाची शासकीय खरेदी करा, विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क माफ करा, सरकारी नोकर भरती तात्काळ करा, महिला सुरक्षेत वाढ करा आदी मागण्या करण्यात येणार आहेत. धरणे आंदोलनात सहभागी होणाऱ्या शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, युवक यांनी आपले वैयक्तिक प्रश्न व सार्वजनिक प्रश्न सोबत आणावे असेही आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन हे धरणे ऐतिहासिक असे धरणे आंदोलन होणार असून प्रत्येक गावातील व वार्डातील प्रतिनिधी आंदोलनात शेळ्या, मेंढ्या, बैलगाडी सह शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक जनता प्रचंड संख्येने सहभागी होणार आहे.