अमळनेर विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करा : माजी नगरसेवक श्याम पाटील
अमळनेर : गेल्या दोन महिन्यापासून सततच्या पावसामुळे अमळनेेर मतदारसंघात शेतात पाणी साचले असून पिके सडून गेली आहेत. शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करुन त्वरित पंचनामे करावेत व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी केली. काल प्रांत कार्यालयाचे आवारात नागरी दक्षता समितीने आयोजित केलेल्या धरणे आंदोलन प्रसंगी ते बोलत होते. नागरी हित दक्षता समितीचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समिती सदस्यांच्या सहकार्याने धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. नागरी हित दक्षता समितीकडून नायब तहसीलदार श्री लोंढे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. पाटील यांनी केले.
निवेदनात केलेल्या मागण्यांमध्ये.. शेतमालाची शासकीय खरेदी झाली पाहिजे, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क माफ करा, सरकारी नोकर भरती करुन रिक्त पदे त्वरित भरा, महिलांच्या सुरक्षेत वाढ करा, पीक विम्याचे पैसे त्वरित द्या, अमळनेर तालुक्यात २०२१ ला झालेली नुकसान भरपाई त्वरित द्या, पाडळसे धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करा, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, कंत्राटी, कायम कर्मचारी यांचे मानधन, वेतन त्वरित द्या, पी. एम किसान योजनेचे पैसे त्वरित द्या, जुनी पेन्शन लागू करा आदी मागण्यांचा समावेश आहे. धरणे आंदोलन स्थळी अनेकांनी या मागण्यांचा उहापोह केला.
मंत्री अनिल पाटील व शिरीष चौधरी यांचेवर ओढले ताशेरे…
लाडक्या बहिणीच्या मेळाव्यासाठी शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता आली असती. पाडळसे धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश न करणाऱ्या मंत्री अनिल पाटील यांचा धरणे आंदोलनात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दहा वर्षात सुतगिरणी सुरु केली नाही तर सुतगिरणी विकून टाकल्याची धक्कादायक माहिती आंदोलन कर्त्यांनी सांगितली. शिरीष चौधरी व अनिल भाईदास पाटील यांनी शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला, युवा, अल्पसंख्यांक, गरीब यांच्यासाठी काहीही केलेले नाही असेही विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
धरणे आंदोलन स्थळी प्रा. अशोक पवार, बन्सीलाल भागवत, सुभाष जिभाऊ, डॉ. अनिल शिंदे, विश्वास पाटील, अॅड. ललिता पाटील, तिलोत्तमा पाटील, गणेश पवार, मनोहर नाना, श्याम पाटील, अरुण देशमुख, भागवत सूर्यवंशी ,शिवाजी दौलत पाटील, धनगर आण्णा, संजय पुनाजी पाटील, गोकुळ आबा आदी उपस्थित होते. सरकारच्या व मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या नाकर्तेपणावर भाषणे केली. दिवसभर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला अमळनेर विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी आरती पाटील, डी. एम. पाटील, परेश शिंदे, प्रवीण देशमुख, प्रताप पाटील, त्र्यंबक मोठा भाऊ, मनोज पाटील, प्रशांत निकम, गजेंद्र पाटील, दिलीप पाटील, पी. वाय. पाटील, श्रीकांत पाटील, अक्षय चव्हाण, दर्पण वाघ, यतीन पवार, अनिरुद्ध शिसोदे, महिला वर्ग आदी उपस्थित होते.