अमळनेर : मराठी साहित्य मंडळ संस्थेतर्फे मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक ठाणे शहर विधानसभा क्षेत्राचे जनसेवक आमदार मा. संजय केळकर होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळ चे प्रणेते तथा मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट होते. प्रमुख अतिथी म्हणून सौ. ललिता गवांदे नाशिक, ज्येष्ठ कवी विनायकराव जाधव कराड, सिद्धार्थ कुलकर्णी महानगर मुंबई प्रदेश अध्यक्ष, सौ. सुनंदा निकम धुळे जिल्हा अध्यक्ष, शिवश्री बापूराव पाटील ठाकरे सर जिल्हाध्यक्ष जळगाव उपस्थित होते.
जनसेवक संजय केळकर म्हणाले की, मराठी साहित्य मंडळाने नवोदित कवी, दुर्लक्षित कवी, नवोदित लेखक यांना प्रकाश झोतात आणले. आजच्या जगात हे काम करायला कोणी तयार नाही ते काम मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोल घुमट आणि त्यांची सर्व टीम करते याचा मला मनापासून आनंद आहे. डॉ जयप्रकाश घुमटकर यांच्या माध्यमातून ठाणे शहराला एक साहित्याची नवी ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यांतून कवी, लेखक, साहित्यिक ठाण्यात आपली उपस्थिती देतात याचा सार्थ अभिमान आहे. मराठी साहित्य मंडळाला वैयक्तिक वा प्रशासनाकडून केव्हाही मदत लागली तर ती देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांनी उपस्थित ज्येष्ठ कवी, नवोदित कवी, लेखक यांचे कौतुक केले. मराठी साहित्य मंडळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन दिले. मराठी साहित्य मंडळाच्या माध्यमातून विविध पुरस्कार सोहळे आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट केला. आणि यात खेड्या पाड्यातील ग्रामीण भागातील दुर्लक्षित कवी, लेखकांना कसा वाव दिला जातो याविषयी प्रकाशझोत टाकला.
कार्यक्रमात ज्येष्ठ गजलकार नीलाताई वाघमारे यांना प्रतिष्ठेचा सावित्री बाई फुले जीवन गौरव साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील जी. के. गोपाळ यांना त्यांच्या सामाजिक कार्याचे योगदान लक्षात घेऊन समाज भूषण पुरस्कार तर वाशी नवी मुंबई येथील डॉ. अजित मगदूम यांना साहित्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
काव्य संमेलनात ३१ कवी, कवयित्रींनी सहभाग घेतला. यात पाच बक्षीसे वितरित करण्यात आली. जळगाव जिल्हा अध्यक्ष शिवश्री बापूराव पाटील (ठाकरे सर), धुळे जिल्हा अध्यक्ष सौ सुनंदा निकम, मुख्य अतिथी म्हणून आलेले ज्येष्ठ कवी लेखक सुरेश लोहार, कवी संमेलनाच्या अध्यक्षा मा.निलाताई वाघमारे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे (नाशिक ) यांनी केले. भिवंडी येथील निकिता पाटील यांनी स्वागत गीत म्हटले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिवंडी तालुका अध्यक्ष, निवेदक सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमास जेष्ठ साहित्यिक, नवोदित कवी उपस्थित होते. ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ राजेंद्र कवडे यांनी सर्वांचे आभार मानले.