
जळगाव : दरवर्षी मराठी साहित्य मंडळ या संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्यांमधून एका लेखकाला त्यांचे साहित्य विश्वातील योगदान पाहून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. यंदाचा हा सन्मान सांगलीच्या डॉ. तारा भवाळकर यांना मिळाला आहे. त्यांच्या निवासस्थानी त्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर यांच्या हस्ते भेट देऊन त्यांना गौरविण्यात आले. डॉ. तारा भवाळकर या ९८ व्या साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष होत्या.
यापूर्वी प्रामुख्याने कराडचे ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव, कोल्हापूरच्या ज्येष्ठ कवयित्री माजी प्राचार्य रेखा दिक्षीत, मुंबईच्या स्मिता राजमाने, ठाण्याच्या ज्येष्ठ गजलकार निलाताई वाघमारे, नागपूरचे डॉ. रविंद्र शोभणे, पुणे येथील भारत सासणे, ठाण्याचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याप्रसंगी नाशिक येथील ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, कराड चे ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, सिद्धार्थ कुलकर्णी, नांदेड चे ज्येष्ठ लेखक डॉ. घनश्याम पांचाळ, राज्य शासनाचे साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. सप्रे सर आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी साहित्य मंडळाच्या या जीवन गौरव साहित्य भूषण पुरस्काराने साहित्य विश्वात विशेष आनंद व्यक्त होत आहे.
