मातोश्रीचा आशीर्वाद आणि श्री मंगळग्रह देवाला अभिषेक घालून मंत्री अनिल पाटील यांनी भरला विधानसभा उमेदवारी अर्ज

खासदार स्मिताताई वाघ यांचेही घेतले आशिर्वाद

अमळनेर : मातोश्रीचा आशीर्वाद आणि श्री मंगळग्रह देवाला सपत्निक अभिषेक घालून मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी महायुती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अमळनेेर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. अनिल पाटलांनी काल दि.२४ ऑक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार स्मिता वाघ यांचेसह महायुतीच्या समर्थकांनी गर्दी केली होती. आपल्या निवासस्थानी मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांची पत्नी सौ. जयश्री अनिल पाटील व वहिनी श्रीमती राजश्री पाटील, नातेवाईक यांनी अनिल पाटील यांचे औक्षण केले. यावेळी अनिल पाटलांनी जळगाव लोकसभेच्या खा. स्मिताताई वाघ यांचेही आशिर्वाद घेतले. अमळनेर भाजपाचे निवडणूक प्रभारी गुजरात येथील मुकेशभाई आंगडीया यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्यात. यानंतर श्री मंगळग्रह देवालाअभिषेक व साकडे घालून तेथून हजारो हितचिंतकांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत महारॅली काढण्यात आली होती.

महारॅलीने अनेकांचे लक्ष वेधले. यावेळी सजावट केलेल्या रथावर मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिताताई वाघ, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचेसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व महायुती चे पदाधिकारी, विविध समाजाचे मान्यवर आणि विविध समाजाच्या महिला भगिनी विराजमान झाल्या होत्या. कार्यकर्त्यांनी डी जे च्या तालावर ठेका धरला होता. कार्यकर्त्यांच्या हाती अनिल पाटील, स्मिताताई वाघ यांचेसह महायुतीचे राज्याचे व जिल्ह्यातील नेत्याचे पोस्टर्स होते. अनिल पाटील व स्मिताताई वाघ रथावरुन जनतेस अभिवादन करीत होते. जोरदार घोषणाबाजी करीत ही रॅली मार्गस्थ झाली, वाटेत विविध ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यास अनिल पाटील यांनी माल्यार्पण केले. पैलाड, दगडी दरवाजा, बस स्टँड मार्गे रॅली प्रांत कचेरीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अनिल पाटलांना खांद्यावर घेत निवडणूक कार्यालयात नेले. कार्यालयात केवळ पाच जणांना प्रवेश अपेक्षित असल्याने खासदार स्मिताताई वाघ, माजी नगराध्यक्ष नरेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या रॅलीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, मार्केट चे आजी माजी पदाधिकारी, ग्रामीण भागातील सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी, सोसायटी चेअरमन व पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक, विविध सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी बांधव, युवक, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!