प्रामुख्याने आमदारकी उपभोगलेले दोन दादा व एक डॉक्टर अशी होणार तिरंगी लढत
अमळनेर : महाविकास आघाडीतर्फे अमळनेर विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. अमळनेर विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला जागा सुटेल अशी अनेक दिवसापासून चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. समोर दोन मातब्बर विरोधक असताना तुल्यबळ उमेदवार असणे गरजेचेच होते. साहजिकच सर्व विचार करून ही जागा काँग्रेसला मिळाली आहे. काँग्रेसकडून आज रात्री जाहीर झालेल्या यादीत डॉक्टर अनिल शिंदे यांचे नाव निश्चित झाले आहे. यामुळे आमदारकी उपभोगलेले दोन दादा व एक डॉक्टर अशी तिरंगी लढत होणार आहे.
विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर अनिल शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी सुरु केली होती. गणेशोत्सव काळात विविध गणेश मंडळांसाठी योगदान, तालुक्यातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना मदत करणे, वाढदिवस – द्वार दर्शन – विवाह सोहळे, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध माध्यमातून ते जनसंपर्कात होते. इतर इच्छुक उमेदवारांच्या तुलनेत सर्वच बाबतीत ते उजवे ठरले. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आपला दावा करीत डॉक्टर अनिल शिंदे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मुंबईत तळ ठोकून होते. महाविकास आघाडीतील चर्चेनुसार जागा काँग्रेसला सुटल्याने तुल्यबळ उमेदवार म्हणून डॉक्टर अनिल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाने त्यांची सुरू असलेली जोरदार तयारी आणि मागील काळात काँग्रेस कडून सक्षमपणे लढवलेली विधानसभा निवडणूक पाहता डॉक्टर शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.