ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुप, मारवड तर्फे ‘वाट माहेरची’ या कार्यक्रमाचे आयोजन

मारवड : कंठ येतो ग दाटूनी.. केव्हा जाईल माहेरी, मला मिळे ग विसावा.. तेथे येता क्षणभरी..! या ओळींतून माहेर काय असते याची प्रचिती येते. या ओळी सार्थ ठरवत अमळनेेर तालुक्यातील मारवड येथे माय माहेरच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी माहेरवाशिणींना एकत्र बोलावून मारवड येथील माहेरवाशिणी तसेच मारवडला शिक्षण घेतलेल्या सर्व सखींना एकत्र भेटण्याचाआनंददायी योग ‘वाट माहेरची’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुळून आला आहे. सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी मारवड येथील सु. हि. मुंदडे हायस्कुल च्या प्रांगणात सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मारवडच्या माहेरवाशिणींचा भव्य स्नेहमेळावा होणार आहे. या कार्यक्रमास कथ्थक नृत्य करणाऱ्या अश्विनी अविनाश चौधरी व वैशाली गजेंद्र पाटील, कथाकार अनिता बोरसे, करोडपती फेम गझलकार, हास्य कवी शरद धनगर, अपेक्षा स्वर म्युझिकल ग्रुप च्या अपेक्षा पवार, गायिका शुभांगी खंडाळे, व्याख्याती रूपाली पाटील, वृक्षवल्ली ग्रुपच्या उपाध्यक्ष योगिता पांडे उपस्थित असणार आहेत.
गावातील सर्वच वयोगटाच्या माहेरवाशिण महिलांसाठी हा कार्यक्रम असून ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुप, मारवड यांचेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. ‘वाट लागे माहेरची, पाय चाले भरभर.. येता माय ची आठवण, मन फिरे घरघर’ या ओळी माय माहेरची महिमा सांगून जातात. कार्यक्रमापूर्वी गावातून रॅली काढण्यात येणार असून विविध कर्तबगार महिलांच्या वेशभूषा साकारल्या जाणार आहेत. मारवड येथील सु. हि. मुंदडे हायस्कुल च्या प्रांगणात सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कथाकथन, नृत्य, कलागुण दर्शन व लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी स्वादिष्ट नमकीन सह अनेक दात्यांनी अनमोल सहकार्य केले आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने माय माहेरच्या आठवणी व बालपणीच्या सर्व मैत्रिणिंना भेटण्याचा दुग्धशर्करा योग असल्याने माहेरवाशिणींकडून कार्यक्रमास भरगच्च प्रतिसाद मिळत आहे. कार्यकमाच्या यशस्वितेसाठी ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुप, मारवड चे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. पंचक्रोशीतील माहेरवाशिणींनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
