मतदार जनजागृती चा मतदारांवर फारसा परिणाम नाही.
मनी (पैसा) मतदानावर परिणाम घडवून आणणार असेच चित्र

अमळनेर : विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांचे उत्कृष्ट नियोजन आणि पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त यामुळे काल दिनांक २० नोव्हेंबर रोजी निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडली. अमळनेर तालुक्यात एकूण सुमारे ६५.६१ टक्के मतदान झाले. एकूण २०२२४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शासन व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात मतदार जनजागृती करण्यात आली होती मात्र अपेक्षेप्रमाणे मतदार जनजागृती चा मतदारांवर परिणाम होऊ शकला नाही. पाच मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने वेळीच यंत्र बदलण्यात आले. दरम्यान तिन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. असे असले तरी अमळनेर विधानसभा मतदार संघात मराठा समाज, माळी समाज, मुस्लिम समाज यांचे मतदान आणि मनी (पैसा ) मतदानावर परिणाम घडवून आणणार असेच चित्र आहे.
अकरा विशेष मतदान केंद्रे सजविण्यात आली होती. मतदान केंद्रांवर लहान मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघर उभारण्यात आले होते. कळमसरे येथे अंगणवाडी सेविकांनी मतदारांच्या लहान मुलांना सांभाळले.
लक्ष्मी दर्शन होत नसल्याने तसेच ग्रामीण भागात बरेच जण शेतातील कामासाठी गेले असल्याने मतदारांमध्ये कुठेही दुपारपर्यंत फारसा उत्साह दिसून आला नाही. दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ३९.३४ टक्के एवढे मतदान झाले होते. दुपारी तीन वाजेनंतर मतदारांची गर्दी वाढून मतदारांनी उशिराने आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यंदा निवडणुकीत चुरस असल्याने सुरत , मुंबई सह बंगलोर, राजकोट, चिपळूण, वापी, अंकलेश्वर, वापी, प्रितमपूर, नाशिक, फलटण येथून ऊसतोड कामगार मतदानासाठी बोलावण्यात आले होते. पहाटे साडे पाच वाजता मॉक पोलला सुरुवात झाली. पातोंडा येथील मतदान केंद्र क्रमांक ५७ वर कंट्रोल युनिट चे बटन खराब झाल्यामुळे ते वेळीच बदलवण्यात आले. तर अमळनेर येथील २१० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर आणि २५९ क्रमांकाचे चोपडायी केंद्रावर बॅलेट युनिट चे बटण खराब झाल्याने तेही वेळीच बदलण्यात आले. मात्र प्रत्यक्ष मतदान सुरू झाले तेव्हा शिरूड येथील २५६ क्रमांकाचे मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट आणि अमळनेर येथील १३३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट च्या पावत्या कट होत नसल्याने तेही बदलण्यात आले.