उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीतील बिघाडी ने दिला होता कौल

अमळनेर : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील हे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार शिरीष हिरालाल चौधरी यांच्यापेक्षा ३३४३५ अधिक मते मिळवून विजयी झाले आहेत. अनिल पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून अमळनेर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मिळाली होती. अनिल पाटील यांना १०८३४५ व पोस्टल ११०५ मते असे एकूण १०९४४५ मते मिळाली. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या शिरीष चौधरी यांना ७५३०० व पोस्टल ७१० मते असे एकूण ७६०१० मते मिळाली. महाविकास आघाडीचे डॉ. अनिल शिंदे यांना १३३५० व पोस्टल ४४८ मते असे एकूण १३७९८ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. महाविकास आघाडीतील बिघाडी ने महायुतीला तारले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अपक्ष उमेदवार शिवाजी दौलत पाटील यांनी १०१३ मते मिळवून हजारी गाठली तर उर्वरित आठ उमेदवारांना एक हजाराचे आतच मते मिळाली. एकूण २०४७६१ एवढे मतदान झाले. यातील एकूण १३१४ व पोस्टल १५ असे एकूण १३२९ मते नोटा ला होती याशिवाय १९४ मते बाद झाली.

श्री मंगळ ग्रह देवतेने अनिल पाटलांच्या हाकेला दिला प्रतिसाद…

श्री अनिल पाटील यांची श्री मंगळ ग्रह देवतेवर अपार श्रद्धा दिसून आली. अमळनेर विधानसभा निवडणुक २०१९ च्या मतमोजणीच्या दिवशी अनिल पाटील सकाळपासून येथील ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात देवाच्या सान्निध्यात होते. यंदाच्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशीही अनिल पाटील हे सकाळपासून श्री मंगळ ग्रह मंदिरात ध्यानस्थ होते. विजयी घोषित होताच अनिल पाटील यांनी प्रथमतः श्री मंगळग्रह देवतेचे पूजन केले. त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेतर्फेही त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर अनिल पाटील मतमोजणी केंद्राजवळ मार्गस्थ झाले.

तालुक्यातील जनतेचा विकास कामांवर विश्वास : अनिल पाटील
- निवडणूकीत झालेला माझा विजय हा महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा आहे.. पक्ष प्रमुख अजित पवार यांनी विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. जनतेने माझ्या विकास कामावर तालुक्यातील विश्वास टाकला.. मला एक लाखापेक्षा अधिक मते देऊन विजयी केले. त्यामुळे मी अमळनेर कर जनतेच्या ऋणात राहू असे आश्वासित केले. सर्व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक, मित्रपरिवार यांना धन्यवाद दिले.
डॉ. अनिल शिंदे यांना महाविकास आघाडीकडून उशिराने उमेदवारी जाहीर झाली. डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीतील बिघाडी सर्वश्रुत होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील पदाधिकारी एकत्रितपणे प्रचार कामाला लागली हे खरे असले तरी तो प्रचार मनापासून होता का ? कोणी साथ दिली ? हे हाती आलेल्या निकालावरून स्पष्ट दिसते. डॉ. अनिल शिंदे यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे त्यांना नियोजन व प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. तरीही प्रचारात कुठेही कसूर ठेवली नाही. महाविकास आघाडीतील बिघाडी..ने महायुतीला तारले. तिरंगी लढतीत महायुतीचाच फायदा झाला. अनिल पाटील यांच्याकडे असलेली प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांचे संघटन व त्यांची मेहनत महत्वाची ठरली. सर्व कार्यकर्ते एकदिलाने सक्रियपणे प्रचार करत होते. यामुळे यशाची आकडेवारी गाठण्यासाठी मदत झाली.
कालपासूनच अनिल पाटील यांचे कार्यकर्ते यांनी बॅनर लावून विजयाचा जल्लोष करायला सुरुवात केलेली होती आणि विजयानंतर हा गुलाल उधळताना जागोजागी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिसून आले. आमदार व मंत्री असताना अनिल पाटील यांची कार्य कुशलता आणि केलेली विकास कामे यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांनी अमळनेरमध्ये दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. निवडणुकीत यश मिळाल्यावर अनिल पाटील यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी महायुतीचे तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने मतमोजणी प्रक्रिया यशस्वीपणे राबवली. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले. निवडणूक कामी उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी शांततापूर्ण मार्गाने निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. पोलीस निरीक्षक विकास देवरे व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.