
अमळनेर : येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने लोकवर्गणी रद्दबातल करावी व पाणीपट्टी वर व्याज आकारणी करु नये यासाठी दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन देण्यात आले. उपमुख्य अधिकारी श्री चव्हाण हे देखील यावेळी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, १) अमळनेर नगरपरिषद गेल्या अनेक वर्षापासून लोक वर्गणी चे नावाखाली न.पा. करदात्यांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूली करीत आहे. सदर नागरिकांवर लादलेली कर वसुली ही अन्यायकारक व बळजबरीची आहे व ती का आकारली जात आहे याचे कोणतेही सबळ कारण नगर परिषदेकडे नाही. तरी ती रद्द करण्यात यावी. २) अमळनेर नगरपरिषद सन २०२४-२०२५ या वर्षापासून पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कात आर्थिक वर्ष ३१ मार्च अखेर असताना, ३१ डिसेंबर पासूनच २% दराने व्याज आकारणी करीत आहे . ती अन्यायकारक व जबरदस्तीची नागरिकांवर लादलेली आहे. नागरिकांमध्ये या बाबतीत तीव्र असंतोष आहे. तरी आपण पाणीपट्टी करा (Water Cess) वरील आकारण्यात येणाऱ्या व्याज /शास्ती रद्द करावी. अशी मागणी त्यात करण्यात आलेली आहे.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने दिलेल्या निवेदनानुसार लोक वर्गणी रद्द करणे व पाणीपट्टी वरील व्याज न आकारणे बाबत आम्ही सकारात्मक असा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. नागरिकांनी नियमित व वेळेवर न. पा. कर भरावा याकरिता अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने जन जागृती करून आम्हास सहकार्य करावे असे विनंती वजा आवाहन देखील त्यांनी केले. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरच्या अध्यक्षा सौ. स्मिता चंद्रात्रे, ॲड. भारती अग्रवाल, महिला प्रांत प्रमुख, सौ. ज्योती भावसार तालुका संघटक, सौ. कपिला मोठे कार्यकारी सदस्य, मकसूद बोहरी जिल्हा सहसंघटक, विजय शुक्ल बँकिंग व सायबर प्रमुख, सुनिल वाघ जिल्हा ऊर्जा प्रमुख, अरविंद मुठे, जनसंपर्क अधिकारी सौ. मेहराज बोहरी आदी उपस्थित होते.