
अमळनेर : तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये नुकतेच शालेय स्तरावर हिवाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये लंगडी, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, कबड्डी, रस्सीखेच, गोणपाट स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के, ईश्वर महाजन, हरी माळी यांनी केले. क्रीडा शिक्षक सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धा संदर्भातील सविस्तर माहिती व नियम समजावून सांगितले. स्काऊट शिक्षक हरी माळी यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले.
लंगडी स्पर्धेमध्ये इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. शुभांगी पाटील प्रथम तर आठवी मधील कु. तनुश्री सोनवणे द्वितीय क्रमांकाने विजयी झाल्या. लिंबू चमचा स्पर्धेमध्ये आठवीची कु. अर्पिता बोरसे प्रथम तर इयत्ता नववीची कु. नूतन पाटील द्वितीय क्रमांकाने विजयी झाल्या. विद्यार्थ्यांमध्ये प्रणव माळी, हिमांशू पाटील, आर्यन शिंदे यशस्वी झाले. गोणपाट स्पर्धेमध्ये इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. निशा जाधव विजयी ठरली रस्सीखेच स्पर्धेत इयत्ता आठवीतून प्रथम चेतन महाजन , मुलीमध्ये नववीतील कु. कोमल जाधव, मुलांमध्ये शिवम भिल, इयत्ता दहावी दुर्गेश महाजन विजयी झाले. संगीत खुर्ची स्पर्धेत इयत्ता आठवीतून कु. खुशी माळी, इयत्ता नववीतील कु. गिरीजा महाजन व विद्यार्थ्यांमध्ये आठवीतील गणेश पाटील विजयी ठरले. कबड्डी स्पर्धेमध्ये दहावीच्या विद्यार्थिनींचा पराभव करत इयत्ता नववीच्या गिरीजा माळी, शुभांगी पाटील, वैष्णवी भरत पाटील, वैष्णवी श्याम पाटील, कोमल जाधव, निशा जाधव, कांचन जाधव विजयी ठरल्या. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शालेय स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी झाल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कार्यक्रमात बक्षीसे दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की, स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेणे महत्त्वाचे आहे. स्पर्धेत यश अपयश येत असते पण या शालेय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व व नेतृत्वगुणांचा विकास होतो असे त्यांनी सांगितले.