
अमळनेर : पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि दानशूर श्रीमंत प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी निमित्त येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात अभिवादन सभा संपन्न झाली. प्रारंभी श्रीमंत स्व. प्रताप शेठजी व स्व.भगिरथीदेवी अग्रवाल यांच्या पुतळ्यांना व पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेस खानदेश मंडळ पदाधिका-यांनी माल्यार्पण केले.
या प्रसंगी राज्यशास्त्र विषयाचे माजी विभागप्रमुख डॉ. एल. एल. मोमया यांनी ‘श्रीमंत प्रताप शेठजी यांचे कार्यकर्तृत्व’ या विषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले की, श्रीमंत प्रताप शेठजी यांनी अमळनेर सारख्या ग्रामीण भागात शिक्षण, वैद्यकीय, आध्यात्म, उद्योग आदी क्षेत्रात मौलिक कामगिरी केली असून अनेकांना रोजगार मिळवून दिला. शिक्षणाची सोय केली. अशा अपूर्व कार्यामुळे प्रताप शेठजी हे जनमानसाच्या मनात घर करून बसले. सामाजिक कार्यकर्ते तथा साने गुरुजी यांच्या साहित्याचे अभ्यासक गोपाळ नेवे यांनी पूज्य साने गुरुजी यांचा जीवन परिचय सांगताना साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखविले. साने गुरुजींच्या अनेक आठवणी त्यांनी याप्रसंगी सांगितल्या. सानेगुरुजी यांचे लेखन कार्य आणि त्यांचे विविध क्षेत्रातील मौलिक कार्य यावेळी त्यांनी ओघवत्या शैलीत मांडले.
या अभिवादन सभेप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, सौ. माधुरी पाटील, विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सी ए निरज अग्रवाल, संचालक डॉ. अनिल शिंदे, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. अरुण जैन, सहचिटणीस डॉ. धिरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, उपप्राचार्य प्रा. पराग पाटील, डॉ. अमित पाटील, डॉ. योगेश तोरवणे यांच्यासह असंख्य प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. धनंजय चौधरी यांनी केले. डॉ. रमेश माने यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
