भारतीय संविधान घराघरात पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत भरली वक्त्यांची कार्यशाळा

युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेेर चा स्तुत्य उपक्रम

अमळनेर : राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत येथील युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेेर तर्फे धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात काल रविवार, दि. १९जानेवारी रोजी ‘भारतीय संविधान’ या विषयावर वक्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील व निवृत्त शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले. सोबत विचारमंचावर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, गौतम मोरे उपस्थित होते. प्रा. अशोक पवार यांनी प्रास्ताविकातून भूमिका स्पष्ट केली. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अजय भामरे यांनी भीम गीत गायले.

निवृत्त शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सिंदखेडराजा येथे केलेल्या भाषणात भारतीय संविधानाचा मुद्दा उचलून धरला हीच भारतीय संविधानाची ताकद असल्याचे सांगितले. भारतीय संविधानाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष असून आजही संविधान घराघरात पोहोचले नाही यामुळे संविधान घराघरात पोहोचविण्यासाठी आयोजकांचा हा पहिलाच स्तुत्य उपक्रम असावा. अशा उपक्रमांची गरज असल्याचेही ते म्हणाले.
प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक डॉ. लिलाधर पाटील यांनी भारतीय संविधानावर आधारित अनेक मुद्दे विशद केले. ते म्हणाले की, शिक्षण सक्तीचे आणि मोफत असले पाहिजे हे भारतीय संविधान सांगते. मात्र शिक्षणाच्या पध्दती बदलल्या आहेत. गरीबांचे शिक्षण वेगळे व श्रीमंतीचे शिक्षण वेगळे पहावयास मिळते. ब्राह्मणवाद हे तत्वज्ञान आहे. सर्वांना देण्यासाठीचं तत्वज्ञान आहे.. बळकावण्याचे तत्वज्ञान नाही. असे असताना बळकावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भारतीय संविधानाने जगण्याचा अधिकार दिला. संविधान हे संसदेने तयार केलेले नाही यामुळे बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही असेही स्पष्ट केले.

भारतीय संविधानावर आधारित वाचन साहित्य प्रा. डॉ. राहुल निकम यांनी तयार केले व ते वक्त्यांना देण्यात आले. दिनांक २४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत भारतीय संविधानावर विविध माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज व महाविद्यालयात व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान चळवळीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय भामरे यांनी केले. प्रेमराज पवार यांनी आभार मानले. अजय भामरे यांनी पोवाडा गायल्या नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानात अधिकाधिक वक्त्यांनी सहभागी होऊन संविधानाचा जागर करावा असे आवाहन युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!