अहिराणी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण; स्वागतासाठी संयोजन समिती सज्ज

अमळनेर : येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरात अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरी राज्यस्तरीय पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनासाठी सज्ज झाली आहे. या संमेलनात अहिराणी गीते, पोवाडे, जात्यावरच्या ओव्या, भारुड, कथा परिसंवाद, कविता यांसह अहिराणी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडणार आहे. विविध मागण्यांचा ठराव संमेलनात करण्यात येणार आहे. दिनांक ३० व ३१ मार्च रोजी होणाऱ्या या अहिराणी साहित्य संमेलनाची जय्यत तयार झाली असून संमेलन संयोजन समितीच्या वतीने या संमेलनाचे आमंत्रण राज्यभरातील अहिराणी साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील संबंधितांपर्यंत तसेच सर्वसामान्य अहिराणी भाषिक व रसिकांपर्यंत प्रचार प्रसाराच्या माध्यमातून पोहोचविण्यात आले आहे. दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता बळीराजा स्मारकापासून निघणाऱ्या शोभायात्रेत अहिराणी संस्कृतीचे दर्शन घडविणारे लक्षवेधी कलाप्रकार व सजवलेले रथ, महिला पथक यासह साहित्य चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी सहभागी असणार आहेत.
यंदाच्या अहिराणी साहित्य संमेलनात शासनाकडे अहिराणी च्या संदर्भात महत्त्वपूर्ण ठराव करण्यात येणार आहेत. अहिराणी बोलीची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यावी, अहिराणीभाषेतील कथा कवितांचा समावेश मराठीच्या अभ्यासक्रमात करावा, अहिराणी भाषेत साहित्य प्रकाशित करण्यासाठी शासनाने विशेष अनुदान घोषित करावे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अहिराणी बोली बोलली जाते हे लक्षात घेऊन विद्यापीठात अहिराणी विषयक अभ्यास केंद्र स्थापन व्हावे यासह विविध मागण्यांचे ठराव अमळनेर येथे होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनात करण्यात येणार असल्याचे मुख्य संयोजक डॉ. लिलाधर पाटील यांनी सांगितले.

स्वेच्छेने मदतीचे आवाहन….
अहिराणी साहित्य संमेलन नगरी परिसरात आर्थिक मदतीसाठी स्कॅनर कोड लावून संयोजकांतर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिक उस्फूर्तपणे स्वेच्छेने आर्थिक योगदान देत आहेत.
संमेलनाच्या मुख्य सभागृहाच्या प्रवेशद्वाराला माजी आमदार सदाशिव अण्णा माळी प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे संमेलन पार पाडावे म्हणून प्रयत्न करीत असल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष अशोक पवार यांनी सांगितले. अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले या संमेलनाचे उद्घाटन करणार असून महाराष्ट्रभरातून येणाऱ्या व अहिराणी भाषेवर प्रेम करणाऱ्या लेखक, कवी, विचारवंत व रसिकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही आमच्या संपूर्ण संयोजन समितीतर्फे सज्ज असल्याचे स्वागताध्यक्ष डी. डी. पाटील यांनी सांगितले.
- मुख्य सभागृहात विशेष आमंत्रित, पई पाहुणा, पत्रकार व रसिकांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्था केली आहे.
- वाहन पार्किंग साठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.
- बाहेर गावाहून येणाऱ्या निमंत्रित साहित्यिकांसाठी मुक्कामाची सोय करण्यात आली आहे.
- अतिथींसाठी दिनांक ३० रोजी रात्री आणि ३१ रोजी दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे.
अशी माहिती मुख्य समन्वयक रणजित शिंदे यांनी दिली.
शोभा यात्रेत सहभागी अहिराणी प्रेमींसाठी जायंट्स ग्रुप तर्फे ताक तर सामाजिक कार्यकर्ते चिंधू वानखेडे यांच्यातर्फे सरबत वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रंथदिंडी व शोभायात्रा सुरू होण्यापूर्वी रॅलीचे समन्वयक डी. ए. पाटील, बापूराव ठाकरे, मेघा पाटील व वैशाली शेवाळे यांच्याशी संपर्क साधावा. सांस्कृतिक कार्यक्रमातील नियोजनाविषयी वसुंधराताई लांडगे, डॉ. कुणाल पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजन समितीमार्फत करण्यात आले आहे. याप्रसंगी संयोजन समिती सदस्य रामेश्वर भदाणे, चंद्रकांत देसले, प्रेमराज पवार, भारती कोळी, प्रा. पवन पाटील, प्रा. माणिक बागले, प्रा. प्रशांत पाटील, महेश पाटील, वाल्मिक मराठे , रेखा मराठे, सुनंदा चव्हाण, हेमकांत अहिरराव, योगेश पाटील, अजय भामरे, सर्जेराव शिसोदे या सहसंयोजन समितीसह जवळपास १०० जणांची समिती संमेलन यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.