ढेकू रोडवरील क्रांतीपर्व स्मारक पुन्हा जैसे थे ; वादाची ठिणगी पडली

ज्यांच्याकडे करण्यासारखे काही उरलेले नाही, त्यांनी दुसऱ्याचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार : श्याम पाटील

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ने नोंदविला निषेध

अमळनेर : सुरुवातीपासून क्रांतीपर्व स्मारकाचे कामात कवडीचाही सहभाग घेतला नाही, कोणतेही योगदान दिले नाही. अशा काही संधी साधू लोकांनी अनधिकृतपणे नगरपालिकेच्या वास्तूत बालिशपणा करत प्रवेश करुन स्मारकाचे लोकार्पण केले. ‘आम्ही फार क्रांतीकारकांच्या प्रेमात आहोत, क्रांतीकारकांचा खूप आदर आहे असे भासविण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्याकडे करण्यासारखे काही उरलेले नाही, त्यांनी दुसऱ्याचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार केलेला आहे. आयत्या बिळावर नागोबा बनण्याची त्यांची परंपरा आहे’ असे वक्तव्य माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी काल दि.१४ एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केले. ढेकू रोडवरील फोर्टस् कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस मराठा सेवा संघाचे प्रा. डॉ. लिलाधर पाटील, प्रा. डॉ. विलास पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

अमळनेर येथील ढेकू रोडवर इतिहासाचे क्रांतीपर्व म्हणून स्मारक उभारण्यात आले आहे. अमळनेर तालुक्याचा स्वाभिमान असलेल्या थोर क्रांतिकारकांचे पुतळे दीड दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत धूळ खात पडलेले आणि कपड्यात झाकून ठेवलेले होते. क्रांतीपर्व स्मारकाचे लोकार्पणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संपर्क मंत्री, पालकमंत्री पात्र नाहीत. आम्ही साने गुरुजींची धडपडणारी मुले असून त्यासाठी आम्ही पात्र आहोत. क्रांतिकारकांच्या तोंडाला पट्ट्या लावून क्रांतिकारकांची मुस्कटदाबी होत होती. एकप्रकारे हा त्यांचा अवमान होत असल्याने जनतेला सहन होत नव्हते असे सांगत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून स्मारक जनतेसाठी खुले करण्यात आले खरे.. मात्र वादाची ठिणगी पडली. काँग्रेसचे कार्यकर्ते केलेल्या कृतीचा आनंद घेत असतानाच मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी तेच पुतळे पुन्हा झाकून ‘जैसे थे’ केले.

श्याम पाटील पुढे म्हणाले की, अमळनेरच्या आजी माजी जनतेच्या कराच्या पैशातून नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह उभारले आहे. या वास्तूवर काही लोक आयत्या बिळावर नागोबा होऊन बसले आहेत. त्याच प्रकारे आता स्मारक बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत का ? असाही प्रश्न आहे. स्मारकाचे लोकार्पण करायचेच होते तर नगरपालिकेशी पत्रव्यवहार केला का ? स्मारक उभारण्यासाठी योगदान देणाऱ्यांशी कधी चर्चा केली का ? स्मारकाचे उद्घाटन दमदारपणे तोलामोलाचे क्रांतीकारकांच्या उपस्थितीत केले असते. परंतु नगरपालिकेची परवानगी न घेता स्मारकाचे थेट लोकार्पण करण्याचे काम ज्यांनी केले अशांचा आम्ही निषेध करतो. जनतेनेही त्यांना जाब विचारायला हवा अशी माफक अपेक्षा व्यक्त केली.

प्रा. डॉ. लिलाधर पाटील म्हणाले की, डॉ. उत्तमराव पाटील आणि लिलाताई यांचे स्मारक व्हावे याबाबत मराठा सेवा संघाने ठराव करुन श्याम पाटलांनी जागा सुचवून पालिकेमार्फत हे स्मारक उभारले. मात्र अजून काम अपूर्ण आहे. प्रत्येक शिल्पाखाली क्यू आर कोड असेल त्याला स्कॅन करून सर्व घटनेचा इतिहास व व्हिडीओ पाहता येतील. जनतेला तसेच नव्या पिढीला क्रांतीचा ईतिहास कळावा यासाठी डॉ. उत्तमराव पाटील आणि लिलाताई लिखित क्रांतीपर्व या ग्रंथाचे पुर्नप्रकाशन करणार आहोत. डॉ. उत्तमराव पाटील आणि लिलाताई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पदयात्रा काढायला कां सुचले नाही ? आताच काही लोकांना काय पुळका आला ? लोकार्पण करताना कोणाची लायकी काढू नये. प्रत्येकाच्या कपाटात प्रत्येकाचे सांगाडे असतात. अनधिकृतपणे उद्घाटन करणे चुकीचे व निंदनीय आहे. मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड या कृतीचा निषेध करत आहे.

प्रा. डॉ. विलास पाटील म्हणाले की, अमळनेर ही क्रांती भूमी आहे. वास्तू साकारण्यासाठी श्याम पाटील पुढे आले. मराठा सेवा संघाच्या संकल्पनेतून निर्माण केलेले हे स्मारक आहे. अजून काही गोष्टींची पूर्तता बाकी आहे. उतावीळ पणा न करता प्रोटोकॉल पाळले गेले पाहिजेत. डिजिटलायझेशन झाल्यावर दिमाखात लोकार्पण केले जाईल असेही ते म्हणाले. क्रांतीपर्व स्मारक हे वैशिष्ट्यपूर्ण योजनेचे ५० लाख आणि अमळनेर पालिकेचे २१ लाख रुपये अशा ७१ लाखांच्या निधीतून उभारले जात आहे. पालिकेकडे १२ लाख रुपये थकबाकी असल्याने अद्याप डिजीटलायझेशन व फिनिशिंग बाकी असल्याचे कळते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!