
अमळनेर : येथील मंगळदेव ग्रह मंदिर येथे मंगळवार, ता.१२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता तुलसी विवाह महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घराचे अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यत: द्वादशीला करतात. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते. दरवर्षीप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रात्री ७.३० ते १० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजनही केले आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मंगळग्रह सेवा समितीचे अध्यक्ष डिगंबर महाले व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.