अंतुर्ली येथे श्री कार्तिक स्वामींच्या यात्रोत्सवास सुरुवात

अमळनेर : तालुक्यातील अंतुर्ली येथे कार्तिकी पौर्णिमेपासून श्री कार्तिक स्वामींच्या यात्रोत्सवास प्रारंभ झाला असून कृतिका नक्षत्रामुळे महिलांना तीन दिवस दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. उद्या ता. १३ रोजी रात्री १० वाजेपर्यंत दर्शनाचा योग असून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. हे मंदिर वर्षातून एकदाच दर्शनासाठी उघडले जात असल्याने महिलांची मोठी गर्दी होत आहे. कार्तिकी पोर्णिमेस ता.११ रोजी सायं.६ वा.२ मिनिटांनी प्रारंभ झाला असून आज मंगळवार ता.१२ रोजी सायं.४ वा.४ मिनिटांपर्यंत पौर्णिमा असल्याने यावेळेत महिलांना दर्शन घेता येणार आहे, तर आज १२ रोजी ८ वाजून ५२ मिनिटांपासून कृतिका नक्षत्रास प्रारंभ होणार असून ता.१३ रोजी रात्री १० वा १ मिनिटांपर्यंत कृतिका नक्षत्र आहे. यामुळे या दोन्ही तिथीवर महिलांना दर्शनाचा योग आहे.

अंतुर्ली येथील कार्तिक स्वामींचे हे मंदिर महाराष्ट्रातील तीन मंदिरांपैकी एक असून दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेस श्री कार्तिक स्वामींचा भव्य यात्रा महोत्सव होत असतो. कृतिका नक्षत्रावर स्त्रियांसह सहकुटुंब कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते. ‘कार्तिक मासे कृतिका नक्षत्रे स्वामी कुर्यात दर्शनम् विप्रो सप्तजन्म धनाढ्या’ म्हणजेच कार्तिक महिन्यात येणाऱ्या कृतिका नक्षत्रावर कार्तिक स्वामींचे सपत्नीक दर्शन घेतल्यास मनुष्य सात जन्म धनवान राहतो अशी आख्यायिका आहे. यामुळे या यात्रोत्सवास विशेष महत्व प्राप्त होत असते. सर्वानी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!