अंधश्रद्धा निर्मुलन करणे म्हणजे आधुनिक विचारांनी जगणे : अविनाश पाटील

प्रेरणादीप व्याख्यान मालेचे समारोप प्रसंगी तिसरे पुष्प

अमळनेर : ‘देवदेवतांच्या नावाने शोषण करणाऱ्या व्यवस्थेला आळा घालणे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मुलन करणे होय. अंधश्रद्धा निर्मुलन करणे म्हणजे आधुनिक विचारांनी जगणे’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले. येथील आय.एम.ए. हॉल,जी.एस.हायस्कूल येथे शिवशाही फाउंडेशन व साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रेरणादीप व्याख्यान मालेच्या समारोप प्रसंगी तिसरे पुष्प गुंफतांना ‘मंतरलेली अंधश्रद्धा’ या विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ होते. प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषदेच्या आमदार स्मिताताई वाघ, जी.एस.हायस्कूलचे चेअरमन योगेश मुंदडा, यांचेसह सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंचचे संस्थापक सदस्य डी.ए.धनगर, शिवशाही फाउंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे आदी उपस्थित होते.
अविनाश पाटील पुढे म्हणालेे की, मंतरलेली अंधश्रद्धा म्हणजे मंत्र मारलेली किंवा भारावलेली, एखाद्या गोष्टीने प्रभावित केलेली श्रद्धा होय. श्रध्दा वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध करता आली तर तो विश्वास होतो. तर अंधश्रद्धा निर्मुलन करणे म्हणजे आधुनिक विचारांनी जगणे शिकणे होय. माणसाचा विवेक उन्नत करते ती ‘श्रद्धा’ व विवेक अवनत करते ती अंधश्रद्धा होय. काल्पनिक गोष्टीचं अधिष्ठान देऊन सामान्यांचं शोषण करण्याला आमचा विरोध आहे. अनुकरणातून अंधश्रद्धा बळावत असते. त्यात महिलांच्या अंधश्रद्धा ह्या पराकोटीच्या असतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रातही मंतरलेली अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धेत धर्माची जोड दिली जाते तर अंधश्रद्धा निर्मुलनात धर्माला स्थान नाही म्हणून जनमानसातील अंधश्रद्धेला तिलांजली दिली पाहिजे. स्मिताताई वाघ म्हणाल्या की, अंधश्रद्धा ही व्यक्तीनिष्ठ असते. महिलांनी अंधश्रद्धा मध्ये गुंतू नये. अध्यक्षीय भाषणातून उदय वाघ यांनी सानेगुरुजींचा विचार जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. समता व बंधुभाव नांदला पाहिजे त्यासाठी असे वैचारिक कार्यक्रम झाले पाहिजेत असे सांगत प्रेरणादीप व्याख्यानमालेला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा वक्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात, उत्कृष्ट शाळा म्हणून विजयनाना पाटील आर्मी स्कूल, प्राचार्य एस. यु. पाटील, चंद्रकांत पाटील, विजयसिंग पवार, वसुंधरा लांडगे, प्रा.विलास पाटील, प्रा.रवींद्र माळी, रवींद्र पाटील, हेमकांत लोहार, डॉ. शरद पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.ए.धनगर यांनी तर वक्त्यांचा परिचय विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विजय पाटील यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!