अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांनी महावितरण कंपनी व नगरपालिका कडे मांडली ग्राहकाभिमुख व्यथा

महावितरण कडे वीज व अमळनेर नगरपरिषदेला पाणी संदर्भात दिले लेखी निवेदन

अमळनेर : अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांनी महावितरण कंपनी उपविभाग -१ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नेमाडे व अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना नुकतेच दिनांक २४ एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले. महावितरण कंपनीकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर शहरातील कोणत्याही भागातील उच्च दाब व लघु दाब वाहिनीवरील वीज दुरुस्ती करण्यासाठी कुठलीही पूर्व सूचना न देता विद्युत पुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. साहजिकच वीज ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नळांना पाणी आल्यास पाणी भरणे शक्य होत नाही. दुपारी व संध्याकाळी उन्हाचे दिवस असल्याने घरात पंखे, कुलर अचानक बंद होतात त्यामुळे वीज ग्राहक तसेच वयोवृद्ध, गृहिणी आणि बालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. चौकशीसाठी आपल्या कक्ष कार्यालयात फोन केल्यास कोणताही प्रकारचा प्रतिसाद देत नाही किंवा फोन बंद असल्याचे समजते. तरी आपण जातीने लक्ष घालून वीज पुरवठा विना सूचना खंडित करू नये अशी सूचना वजा तक्रार करण्यात आली आहे.

अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर शहरात मुंदडा नगर, लक्ष्मीनगर आदी भागात जलवाहिनी फुटल्याने अनियमित पाणीपुरवठा होत आहे. तेथील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. तेथील रहिवाशांकडून आपण पाणी कर नियमित करवसुली करीत आहात. करभरणा करण्यात उशीर झाल्यास त्यावर शास्ती दंड सुद्धा आकारत आहात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमान खूप वाढलेले आहे. अशावेळी पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पाणी अत्यावश्यक सेवेमध्ये येते व पाणी पुरवठा बाबत विलंब हा एक नागरी अथवा ग्राहक सेवेची त्रुटी मध्ये गणली जाते. ती जबाबदारी आपण टाळू शकत नाहीत. तरी आपण ग्राहकांची नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने अंमलबजावणी करून ग्राहकांना नियमित पाणीपुरवठा करावा व याबाबत ग्राहकांना नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अशी तक्रार वजा सूचना करण्यात आलेली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, आगामी नूतन वर्ष सन २०२५ -२०२६ या वर्षात आपण लोक वर्गणी नागरिकांकडून आकारणार नाही असे आम्हाला आश्वासन दिलेले होते तरीदेखील यावर्षीचे बिलात आपण ती आकारणी करू नये अशी आपणास विनंती करण्यात येत आहे. अमळनेर नगर परिषदे तर्फे उपमुख्य अधिकारी चव्हाण साहेब यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी सौ स्मिता चंद्रात्रे अध्यक्ष, ॲडव्होकेट भारती अग्रवाल महिला प्रांत प्रमुख, वनश्री अमृतकर सचिव, मकसूद बोहरी जिल्हा पालक, विजय शुक्ल जिल्हा सायबर व बँकिंग प्रमुख, सुनील वाघ जिल्हा ऊर्जा प्रमुख आणि सतीश देशमुख जिल्हा उपसचिव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती संपर्क अधिकारी सौ. मेहराज बोहरी यांनी दिली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!