कुटुंबच नव्हे तर भारत देश महत्वाचा; सुटीवर आलेले सैनिक वरिष्ठांच्या आदेशाने पुन्हा आपल्या कर्तव्यावर रवाना

अमळनेर : कुटुंबच नव्हे तर भारत देश महत्वाचा म्हणत सुटीवर आलेले सैनिक वरिष्ठांच्या आदेशाने आपल्या कर्तव्यावर रवाना झाले आहेत. माजी सैनिकांच्या खान्देश रक्षक संघटनेने त्यांना प्रोत्साहन देत अभिमानाने रवाना केले आहे. झाडी येथील जगदीश विश्वास पाटील यांना तर त्यांच्या बिहार येथील कर्तव्या ऐवजी सरळ जम्मू काश्मीर येथे बोलावण्यात आले आहे. अनेक सैनिक सुट्या घेऊन गावी आले होते. नारायण चौधरी आणि संभाजी पाटील हे दोघे आपल्या वडिलांच्या ऑपरेशन साठी सुटीवर आले होते. पण आता ते ऑपरेशन सिंदूर साठी रवाना झाले आहेत. बापाचे ऑपरेशन नव्हे तर ऑपरेशन सिंदूर महत्वाचे आहे, बापाएवढीच भारत माता महत्वाची असल्याचे दिसून आले. पिंपळे येथील दिनेश नानाभाऊ पाटील व भिकन नानाभाऊ पाटील हे दोघे बंधू कौटुंबिक समस्येसाठी सुटीवर आले होते. युद्ध सुरू होताच दोघे भाऊ घरची समस्या सोडून देशाची समस्या सोडवायला रवाना झाले आहेत. त्याच प्रमाणे गणेश कुरकुरे, मोहन पाटील, खुशाल पगारे, गौतम सैंदाणे हे देखील सुटीवरून कर्तव्यावर परत गेले आहेत.

विमान काही वेळ थांबवले…

शिरूड येथील भटू झुंबर पाटील यांना तातडीने बोलावणे आले. त्यांना पुण्याहून रवाना व्हायचे होते म्हणून ते आपले मित्र धनराज पाटील यांच्या सोबत खाजगी वाहनाने जळगाव विमान तळावर जात असताना उशीर झाला. अखेर विमानतळावर कळविल्यानंतर विमान काही वेळ थांबवण्यात आले होते.

आपल्या कर्तव्यावर परत जाणाऱ्या सैनिकांना अधिक प्रेरणा मिळावी म्हणून माजी सैनिकांच्या खानदेश रक्षक संघटनेचे राजेंद्र यादव, जितेंद्र सोनवणे, रमेश चौधरी, ईश्वर चौधरी, चंद्रकांत पाटील, धनराज पाटील, विजय सूर्यवंशी, नामदेव यादव, जगदीश पाटील, कैलास पाटील आदी माजी सैनिकांनी त्यांचा सत्कार करून फुलांनी सजविलेल्या वाहनावर स्वार करत ‘भारत माता की जय, वंदे मातरम, हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा देत रवाना केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!