महामार्गावर व शहरात बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी अशा प्रकारची वाहने उपयुक्त ठरतील.
जळगाव : राज्यातील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता होणारे अपघात कमी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकडून आधुनिक सुविधा असलेली ‘इंटरसेप्टर वाहने’ खरेदी करण्यात आली आहेत. लेझर तंत्रज्ञानावरील स्पीडगन, ई-चलन यंत्रणा, मद्यपींवरील कारवाईसाठी ब्रेथ ॲनलायजर यांसारख्या अनेक सुविधा या वाहनात उपलब्ध आहेत. जळगाव जिल्ह्यासाठी तीन ‘इंटरसेप्टर वाहने’ पोलीसांना दिली आहेत. यामध्ये जळगाव शहर वाहतूक शाखा, महामार्ग वाहतूक पाळधी व महामार्ग वाहतूक चाळीसगाव यांना ही वाहने देण्यात आली आहेत.
अनेक वाहनचालक वेगमर्यादा ओलांडतात, काही मद्यप्राशन करून वाहने चालवितात यामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांना निमंत्रण मिळते. बेशिस्तीला आळा बसून महामार्गावर व शहरात कारवाई करण्यासाठी अशा प्रकारची वाहने उपयुक्त ठरतील. “इंटरसेप्टर व्हेइकल” चे वितरण पुण्यात करण्यात आले. वितरण कार्यक्रमास पाळधी महामार्ग विभागाचे चालक कपिल चौधरी, सहाय्यक निरीक्षक सुनील मेढे, घन:श्याम पवार गेले होते. त्यांनी इतरांनाही प्रशिक्षित केले.