तडकाफडकी कार्यवाही झाल्याने भ्रष्टाचार व गैरकारभार करणाऱ्या ग्रामसेवकांचे व सरपंचाचे धाबे-दणाणले.
अमळनेर : तालुक्यातील एकलहरे येथील ग्रामपंचायतीच्या मिळकतीत नमुना नंबर ८ मध्ये २००२ ते २०१५ दरम्यान सरपंच आणि ग्रामसेवकांनी खाडाखोड करून क्षेत्रफळ वाढ प्रकरणी तत्कालीन २ सरपंच आणि तीन ग्रामसेवकांविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. एकलहरे येथील ज्ञानेश्वर विनायक पाटील व जयवंताबाई विनायक पाटील यांनी २०१८ मध्ये पंचायत समितीला, एकलहरे ग्रामपंचायतीच्या मिळकत क्रमांक १०२ (क) मध्ये २००२ ते २००५ दरम्यान खाडाखोड व गिरवागिरव करून क्षेत्रफळ वाढविल्याची तक्रार करुन तत्कालीन ग्रामसेवक व सरपंचांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. तक्रारीची दखल पंचायत समिती येथे घेतली जात नसल्यामुळे तक्रारदार यांनी वेळोवेळी उपोषण देखील केले होते. तत्कालीन ग्रामसेवक गुलाबराव सूर्यवंशी यांनी या मिळकतीचे वेगवेगळ्या क्षेत्रफळाचे उतारे दिल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली होती. दरम्यान २००२ ते २०१९ पर्यंत तक्रार करूनही मिळकत १०२ क च्या नोंदीची योग्य दुरुस्ती करण्यात आली नाही. तसेच विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारीकडे सादर केल्यानंतर त्यांनी संबंधितांवर शासन परिपत्रकाप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश व आदेश दिले होते. प्रहार संघटनेचे अमळनेर तालुका अध्यक्ष यांनी या प्रकरणात लक्ष घालून कारवाईची मागणी केली होती.
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल राणे यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून २०१५ पासूनचे सरपंच मिनाबाई फत्तेलाल पाटील ,भास्कर सीताराम पाटील व तत्कालीन ग्रामसेवक विजय विश्वासराव देसले (हल्ली पंचायत समिती, भडगाव ), चतुर साहेबराव देवरे (हल्ली पंचायत समिती, धरणगाव) व एकलहरे चे ग्रामसेवक महेश गणेश पाटील यांच्याविरुद्ध भादंवि ४२० , ४६५ , ४६८, ४७१ प्रमाणे फसवणूक व खाडाखोड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण करीत आहेत. गांवच्या विकासाची धुुरा सांभाळणारे सरपंच व ग्रामसेवक हेच गाव विकास न करता स्वतःचा विकास करत असल्याचे या सर्व प्रकरणातून लक्षात येत असून जनतेला सर्व साधारण न्यायासाठी देेेेखील संघर्ष करावा लागतो. या निमित्ताने अमळनेर पंचायत समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तत्कालीन विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी आपले कामकाज व्यवस्थित पार पाडले नसल्यानेच हा सर्व गैरकारभार झालेला असल्याने त्यांच्यावर देखील या प्रकरणांत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे.
गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या कार्यकाळात पंचायत समिती कार्यक्षेत्रातील भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर तडकाफडकी कार्यवाही झाल्याने भ्रष्टाचार व गैरकारभार करणाऱ्या ग्रामसेवकांचे व सरपंचाचे धाबे-दणाणले असून राजकीय लोकांनी त्यांची बदली करण्याची मागणी लावून धरली असल्याची चर्चा आहे. त्यांनी केलेल्या कार्यवाहीचे कौतुक होत आहे .