अमळनेरचे सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे व प्रशांत निकम यांच्या सहीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य प्रमुख देशांच्या प्रमुखांनाही पत्र

अमळनेर : येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे व प्रशांत निकम यांनी युध्दाच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध देशांच्या प्रमुखांना पत्र पाठवून ‘युद्धमार्ग थांबवा.. आपण शांततेने जगू या आणि इतरांनाही जगू द्या’ ची हाक दिली आहे. आज दिनांक २३ जून रोजी भारत, अमेरिका, इराण, इस्त्रायल, पाकिस्तान, पॅलेस्टिन, युक्रेन, रशिया, चीन या प्रमुख देशांच्या प्रमुखांना पत्र पाठवून विनम्र आवाहन केले आहे.
पत्रात म्हटले आहे की, ही पृथ्वी अप्रतिम निसर्गाने सजलेली एक सुंदर देणगी आहे. मानव जातीने येथे शतके आनंदाने जीवन जगले आहे. परंतु, आज अधिक सत्ता, अधिक मालमत्ता आणि अधिक वर्चस्व या अमर्याद लालसेमुळे माणूस स्वतःच्या विनाशाकडे वाटचाल करीत आहे. सत्ताकांक्षेच्या स्पर्धेमध्ये देश विध्वंसक शस्त्रांकडे वळत आहेत. इतरांच्या जिवीत वा कल्याणाची कोणतीही पर्वा न करता अण्वस्त्रांचा वापर मानवाच्या अस्तित्वाला धोक्यात आणू लागला आहे. निसर्गाचा समतोल ढासळू लागला आहे आणि मानव, प्राणी, वनस्पती, सारे जीव धोक्यात आले आहेत. आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करतो की, कृपया युद्धाचा हा भीषण मार्ग थांबवा. विध्वंसक शस्त्रांची निर्मिती व वापर थांबवावा. आपण सर्वांनी मिळून शांततेचा, प्रेमाचा आणि परस्पर सन्मानाचा मार्ग स्विकारू या. आपण समतेने जगू या आणि इतरांनाही जगण्याची संधी देऊ या. आपण सगळे या पृथ्वीवर थोड्याच काळासाठी आहोत याची जाणीव ठेवून भविष्यातील पिढ्यांसाठी पृथ्वीचे रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. जी शस्त्रे पृथ्वीचा संपूर्ण नाश करु शकतात ती शस्त्रे निर्माण व वापर करुन आपण आपल्या पुढील पिढ्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करत आहोत. तरी कृपया, हा भयंकर युद्धमार्ग थांबवा, आपण शांततेने जगू या.. इतरांनाही जगू द्या.