अमळनेर को-ऑप. अर्बन बँकेच्या वार्षिक सभेत सभासदांना ९ टक्के ऐवजी १० टक्के लाभांश देण्याचा ठराव संमत

बँकेच्या शाखा काढाव्यात, सभासदांना विशेष भेट वस्तू द्याव्यात यांसह सभासदांनी केल्या विविध सूचना


अमळनेर : शतक महोत्सवी वर्षानिमित्त अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल दिनांक १० रोजी इंदिरा भवन येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे होते. यावेळी जेष्ठ संचालक प्रविण जैन, मोहन सातपुते, भरत ललवाणी, लक्ष्मण महाजन, प्रदीप अग्रवाल, दिपक साळी, अभिषेक पाटील, प्रविण पाटील, सौ.वसुंधरा लांडगे, डॉ. मनिषा लाठी, ॲड. व्ही. आर. पाटील, ॲड. विजय बोरसे, बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. सभेवेळी बँकेतर्फे गरीब गरजू रुग्णांसाठी आरोग्य साधनांचे लोकार्पण व बॅंकेच्या सभासद पाल्यांचा गौरव समारंभ देखील पार पडला. शतक महोत्सवी वर्षानिमित्त १० टक्के लाभांश देण्यासह संचालक मंडळाचा अभिनंदन ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित सभासदांनी मंजूर केला. सभेच्या प्रारंभी बँकेच्या ज्ञात, अज्ञात दिवंगत सभासद व बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे यांचे पिताश्री तथा बँकेचे माजी चेअरमन स्व. गोविंद मुंदडे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रास्ताविक करताना बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी शतक महोत्सवी वर्षात बँकेतर्फे सहकार मंत्री यांचे उपस्थितीत झालेला भव्य सभासद, ग्राहक मेळावा, समग्र आरोग्य तपासणी शिबिर, विद्यार्थी गुणगौरव समारंभ, बँकेच्या इमारतीचे नूतनीकरण, विविध नविन आर्थिक योजनांसह विविध समाजोपयोगी उपक्रम व सर्वाधिक व्याजदर देणारी ‘अमृत धनसंचय १००’ योजनेबाबतची माहिती दिली. सभेचे अध्यक्ष तथा बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी शतक महोत्सवी वर्षानिमित्त अमळनेर को.ऑपरेटिव्ह अर्बन बँक तर्फे गरीब गरजू रुग्णाच्या सेवा सुविधेसाठी मेडिकल बेड, अपंग व्हील चेअर, वॉकर तसेच वॉटर बेड यासह आवश्यक आरोग्य साधनांचे लोकार्पण करीत असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी दहावी, बारावीत ७५% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या बँक सभासदांच्या उपस्थित गुणवंत पाल्यांचा गौरव बँकेतर्फे भेटवस्तू देवून ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आला.

सदर सभेत शतक महोत्सवी वर्षानिमित्त अजेंडा वर नमूद असलेला सभासद लाभांश ९ टक्के ऐवजी जाहीर केल्याप्रमाणे १० टक्के करण्यात यावा अशी मागणी दिलीप ठाकूर यांचेसह उपस्थित सभासदानी केली. सदर लाभांश १० टक्के करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. सभासद सोमचंद संदांनशिव, दिलीप ठाकूर, पी. वाय. पाटील, प्रफुल भदाणे, उमाकांत नाईक, एस. टी. पाटील, गुलाब महाजन आदी सभासदांनी बँकेच्या शाखा काढाव्यात, शतक महोत्सवानिमित्त सभासदांना विशेष भेट वस्तू द्यावी यासह विविध सूचना मांडल्या. सभेचे सुत्रसंचालन व्यवस्थापक अमृत पाटील यांनी केले तर ज्येष्ठ संचालक पंडित चौधरी यांनी आभार मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी वृंद, पिग्मी एजंट यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!