
एक काळ होता तो.. ज्या काळात नैसर्गिक जन्म -मृत्यू ची वेळ निश्चित सांगता येत नव्हती. आजच्या प्रगत विज्ञान काळात विशिष्ट दिवशी बाळ जन्माला घालण्याची जणू नवी पध्दत रुढ होत आहे. विशिष्ट दिवशी कोणाचा जन्म होणं हा योगायोग असायचा. हल्ली जन्माचा योग जुळवून घेतला जातो. मृत्यूच्या बाबतीत शक्यतो कुणी असं करत नाही. वेळोदे येथील प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा स्वातंत्र्यसैनिक मोतीराम पाटील यांचे चिरंजीव तथा आमचे ज्येष्ठ पत्रकार मित्र, कवी, साहित्यिक, मार्गदर्शक सुभाष पाटील (घोडगावकर) यांचा आज जन्मदिवस. चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

पत्रकार सुभाष पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घोडगाव येथे झाले. दरम्यानचे काळात इयत्ता आठवीचे शिक्षण अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर जळगावच्या कृषी महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी नोकरी न करता आपले आयुष्य पत्रकारिता व साहित्यासाठी वाहून घेतले. सन १९६८ मध्ये जळगावच्या साप्ताहिक ‘प्रबोध चंद्रिका’ मध्ये त्यांची पहिली कविता छापून आली… तो आनंद काही वेगळाच होता. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात नामांकित असलेले गांवकरी, लोकमत, बातमीदार या वृत्तपत्रांतून लेख, कविता लिखाणात सातत्य ठेवले. त्या काळी त्यांची अंधारातील दिवे, चैतन्याचे झरे ही सदरे गाजली आहेत. साहित्य निर्मितीत आजपर्यंत त्यांची नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यात.. पाऊलखुणा, वेदना, वसन्त वादळ, कडू-गोड, ऊन सावली आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘हिरवा शेला’ या मराठी चित्रपटासाठी काही गाणी लिहिली आहेत. जळगाव आकाशवाणी केंद्रावर पूर्वी कै. माधवराव सुतार यांचे जळगाव जिल्हा वार्तापत्र प्रसारित होई. त्यांचे नंतर जळगाव जिल्हा वार्तापत्र प्रसारित होण्याचा मान सुभाष पाटील यांना मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रौढ प्रशिक्षणात औरंगाबाद येथील लेखक शिबिरात त्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.
महाराष्ट्र शासनातर्फे वर्धा येथील सेवाग्राम या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती स्थळी ते आठ दिवस मुक्कामी असतांना त्यांची प्रत्यक्ष भेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सुनबाई व आचार्य राजगोपालचारी यांची मुलगी निर्मला गांधी यांचेशी झाली होती. या भेटीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आयुष्यावरील अनेक पैलूंची माहिती मिळाली. या भेटीचा सार ‘ऊन सावली’ या पुस्तकात आहे. सदर पुस्तक हे कुष्ठरोगावर आधारित आहे. या सर्व प्रवासात आयुष्यभर साथ देणाऱ्या सौ. रेखाताई पाटील यांची साथ मिळाली यामुळे ते विविधांगी लिखाण करू शकले. त्यांना सन १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
सन १९९७ मध्ये अघटीत घडले. सुभाष पाटील यांचा अपघात होऊन त्यांचा उजवा हात आणि एका पायाला गंभीर दुखापत होऊन ७०% अपंगत्व आले. तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या कै. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून त्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली होती. ही योजना प्रथम जळगाव येथे सुरु झाली व या योजनेचे ते पहिले लाभार्थी ठरले आहेत. अशा कठीण प्रसंगी देखील सुभाष पाटील यांनी न डगमगता आपला साहित्य व पत्रकारितेचा वसा जपला. एक नवा मार्ग शोधून डाव्या हाताने लिखाणाला सुरुवात करत साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात खंड पडू दिला नाही. पत्रकारितेवरील आपली पकड कायम राखली म्हणूनच आज ते अधिस्वीकृतीधारक पत्रकार आहेत.
जळगाव येथे सन २००२ मध्ये जळगाव जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला होता. आजही ते पत्रकार दिनी होणाऱ्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतात. राज्य सरकारकडून नुकतीच पत्रकार पेन्शन योजना लागू करण्यात आली. या पत्रकार पेन्शन योजनेत पात्र होण्यासाठी त्यांनी संघर्ष करत आपली बाजू ठामपणे लाऊन धरली होती. यात ते यशस्वी झाले. अमळनेर तालुक्यातून पत्रकार पेन्शन घेणारे ते एकमेव पत्रकार ठरले आहेत. आपल्या या वाटचालीत दादासाहेब पोतनीस (नाशिक), आचार्य प्र. के. अत्रे व त्यांची मुलगी शिरीष पै, भाई मदाने (धुळे) व कै. माधवरावजी सुतार (अमळनेर) यांचा नामोल्लेख करत त्यांना आपले आदर्श मानतात. गेल्या काही वर्षांत पत्रकारिता ही संकल्पना विकसित झाली असली तरी, या पद्धतीचा मूळ उद्देश तोच आहे. दिव्य चक्र परिवारातर्फे पत्रकार सुभाष पाटील यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा..!
