ऐन पावसाळ्यात रेऊनगर मध्ये पाण्याचा तुटवडा.. रहिवाशांची तारांबळ

संतप्त नागरिकांनी लक्ष्मीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर जाऊन केले ठिय्या आंदोलन

अमळनेर : येथील ढेकूसीम रोड वरील विश्वकर्मा मंदिरासमोरील रेऊनगर भागात ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या दहा दिवसांपासून पाणी सोडलेले नव्हते. दहाव्या दिवशी पाणी पुरवठा केला असता, विश्वकर्मा मंदिरासमोरील रेऊनगर भागातील रहिवाशांच्या नळाला पाणी येत नव्हते असे सातत्याने होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक संतप्त होऊन लक्ष्मीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर जाऊन ठिय्या आंदोलन करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

पावसाळा सुरु असल्याने सर्वत्र पाऊस पडतो आहे, तापी नदीला पुरेसे पाणी आहे. मात्र अमळनेर शहरात अजूनही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. चाळीस वर्षांपूर्वीची सर्वात जुनी कॉलनी रेऊ नगर येथील रहिवाशांना याची सगळ्यात मोठी झळ बसत आहे. या भागात सातत्याने अवेळी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे येथील रहिवाशांची तारांबळ होत असते. येथे मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग असल्यामुळे दुपारच्या वेळेस पाणी आल्यास पाणीच मिळत नाही. संतप्त नागरिकांनी आम्हाला पाणी मिळावे यासाठी नगरपालिकेबद्दल असंतोष व्यक्त केला. यापूर्वी अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करूनही कायमस्वरूपी उपाययोजना केली गेली नाही, नगरपालिकेकडून आम्ही जास्त वेळ पाणीपुरवठा करतो असे सांगितले जाते. येथील खूप मोठा परिसर एकाच व्हाॅलवर जोडलेला असल्यामुळे शेवटच्या घरांना पाणी मिळत नाही. गेल्या पंचवीस वर्षापासून चार कॉलनी मिळून एकच व्हाॅल आहे. दरम्यानच्या काळात वस्ती वाढली पण व्हाॅल एकच राहिला त्यामुळे त्यावर ताण पडतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी व नवीन व्हाॅल बसविण्यात यावा अशी मागणी समस्त रहिवाशांची होती. या बाबींचा नगरपालिकेने गांभीर्याने विचार करावा अन्यथा रोषास सामोरे जावे लागेल असा इशारा संबंधित रहिवाशांनी दिला. यावेळी परिसरातील मच्छिंद्र बडगुजर, विलास बिरारी, दिपक ठोके, रवींद्र पाटील, विजय पाटील, तुकाराम धनगर, मिलिंद निकम, प्रमोद साळुंखे, प्रशांत काटकर, गणेश पाटील, सोनल पाटील, प्रतिभा पाटील, पुष्पा बडगुजर, विद्या साळुंखे, आशा ठोके, रेखा पाटील, शितल धनगर यांच्यासह अनेक रहिवाशांचा सहभाग होता.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!