‘ना भूतो ना भविष्यती’ विद्यार्थी काँग्रेसचा लढा : ॲड. कौस्तुभ पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर

पुणे : अलीकडील काळात विविध विद्यापीठांतील व महाविद्यालयांतील निवडणुकांमध्ये मतदार याद्यांमध्ये फेरफार, खोट्या नावांची भर, मतदान केंद्रांवरील गैरव्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या मूलभूत मतदान हक्काचे उल्लंघन झाल्याच्या अनेक घटना प्रकाशझोतात आल्या आहेत. या अन्यायकारक प्रकारांना थेट आव्हान देण्यासाठी व विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व चौकात मतदान चोरी (Vote Chori ) या गंभीर प्रश्नावर या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुणे शहरात वातावरण तापले होते. ‘मतदान चोरी बंद करा – विद्यार्थी हक्क वाचवा’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

या आंदोलनात विद्यार्थी चळवळीतील आवाज ॲड. कौस्तुभ पाटील यांची भूमिका अत्यंत लक्षणीय ठरली. विद्यार्थी प्रश्नांबाबत त्यांनी मांडलेले मुद्देसूद विचार, केलेले कायदेशीर विश्लेषण आणि आंदोलनाचे काटेकोर नियोजन यामुळेच हा लढा प्रभावी ठरला. आंदोलनादरम्यान प्रशासनाने त्यांना अटक करून काही तासांतच सुटका केली, परंतु या घटनेने विद्यार्थ्यांच्या रोषाला अधिक धार मिळाली.
मतदानाचा हक्क हा संविधानिक हक्क…
कौस्तुभ पाटील यांनी अटकेनंतर सांगितले की, विद्यार्थ्यांचा मतदानाचा हक्क हा संविधानिक हक्क आहे. मतदान चोरी हा फक्त फसवणुकीचा प्रकार नाही तर विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर डल्ला आहे. आम्ही हा लढा शेवटपर्यंत नेऊ आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज बुलंद करीत राहू.
या आंदोलनामुळे विद्यार्थी काँग्रेसची ताकद अधोरेखित झाली तसेच पुण्यातील विद्यार्थी चळवळीला नवे उर्जितत्व लाभले. मतदान चोरी सारख्या गंभीर प्रश्नाकडे संपूर्ण समाजाचे लक्ष वेधून हा लढा भविष्यातील विद्यार्थी राजकारणाला दिशा देणारा ठरेल यात शंका नाही.
