सामुहिक पारायण, अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन

अमळनेर : शहरातील दादासाहेब जी. एम. सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने अभिषेक, माळजप, अध्याय सामूहिक पारायण वाचन (१९ वा व २१ वा अध्याय), लघुरुद्र अभिषेक, सामुहिक आरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सामुहिक पारायण वाचन महिला वारी प्रमुख व संत गजानन महाराजांच्या निस्सीम भक्त ज्योतीताई पवार यांनी केले. लघुरुद्र अभिषेक हा धार्मिक विधी अशोक भावे महाराज व नितीन भावे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या प्रसंगी संत गजानन महाराज सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर. बी. पवार, मंदिराचे पुजारी रघुनाथ पाटील तसेच शहरातील अनेक गजानन भक्त व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. या धार्मिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संत गजानन परिवारातील सर्व महिला भगिनी व बांधवांनी परिश्रम घेतले. सोहळा अत्यंत भक्तिमय, खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. उपस्थित भक्तांनी श्री संत गजानन महाराजांच्या चरणी कृतार्थ झाल्याची अनुभूती व्यक्त केली. अनेक गजानन भक्त व भाविकांनी शहरातील व तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित संत गजानन महाराज समाधी सोहळा व पुण्यतिथी कार्यक्रमांनिमित्त महाराजांचे दर्शन घेतले.