दोन्ही विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी निवड

अमळनेर : येथील जी. एस. हायस्कूल च्या लायन्स क्लब हॉल येथे अखिल भारतीय तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा पार पडला. या मेळाव्यात तालुक्यातील इ.८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या स्पर्धेत अमळनेर च्या साने गुरुजी कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. रिया दिनेश जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला तर वावडे येथील बी. बी. ठाकरे हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. खुशी विनोद ठाकरे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. कु. हेतल रविंद्र बिऱ्हाडे (पी. बी. ए. इंग्लिश स्कूल, अमळनेर), मयूर गजानन पाटील (साने गुरुजी विद्यालय, अमळनेर) यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.
अमळनेर तालुक्यातून एकूण १५ शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. यापैकी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थीनींची आगामी जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी ह्या वर्षी ‘क्वांटम युगाची सुरुवात : संभाव्यता व आव्हाने’ हा विषय देण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ सन २०२५ हे आंतरराष्ट्रीय क्वांटम वर्ष साजरा करीत आहे. त्यामुळे ह्या विषयाला विशेष महत्त्व असून विद्यार्थ्यांना भविष्यात उच्च शिक्षणात खूप फायदा होणार आहे. सदर मेळाव्यासाठी अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

विज्ञान मेळाव्यासाठी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पाटील, जी. एस. हायस्कूल चे मुख्याध्यापक विनोद कदम, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे, कार्याध्यक्ष डी. के. पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, गणित मंडळाचे अध्यक्ष डी.ए. धनगर, कलाध्यापक संघाचे आर. डी. चौधरी, विज्ञान मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, दिपक महाजन, नंदा पाटील, भाग्यश्री वानखेडे यांच्यासोबतच विज्ञान शिक्षक अजय बोरसे, भारती पाटील, माधुरी पाटील, स्वाती माळी, कसबे मॅडम, मयूर कदम, अजय पाटील, राहुल भदाणे, श्री.वैद्य, एच. डी. बेहेरे, गटसाधन केंद्राचे प्रशांत पाटील, देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील कार्यक्रमास उपस्थित होते. परीक्षक म्हणून जेष्ठ विज्ञान शिक्षक तथा तज्ज्ञ मार्गदर्शक डी. के. पाटील, जगदीश पाटील यांनी काम पाहिले.
स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक व शाळा परिवार, शिक्षण प्रेमींकडून कौतुक होत असून, जिल्हास्तरीय मेळाव्यात ते अधिक यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
