प्रताप महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन संपन्न

साहित्यातील अनुभव, संस्कार आणि विचार समाजाला दिशा देतात : प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी

अमळनेर : “आपल्या मातीत काय लिहिलं गेलं ते वाचणं हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. विशेष महत्वाचे म्हणजे साहित्यातील अनुभव, संस्कार आणि विचार समाजाला दिशा देतात.” असे मत धुळे येथील प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. ते येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), मराठी विभागाच्या वतीने “मराठी वाङमय मंडळाचे” उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. त्यांनी ‘मराठी साहित्याचे सामाजिक योगदान’ या विषयावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एच. डी. जाधव होते.

डॉ. सूर्यवंशी यांनी साने गुरुजी आणि अमळनेर शहराचे संबंध, साहित्याने दिलेला सामाजिक आधार, प्राचीन ते आधुनिक मराठी साहित्याचा प्रवास तसेच खानदेशातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान या विषयांवर प्रकाश टाकला. त्यांच्या भाषणाने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये साहित्यविषयक कुतूहल आणि प्रेरणा निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एच. डी. जाधव यांनी “साहित्य हे मानवी जीवनाला दिशा देण्याचे काम करते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर वाचन संस्कृती वाढवणे गरजेचे आहे. ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला कलाटणी देत असते.” असे प्रतिपादन केले.

यावेळी कार्यक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. रमेश माने, प्रा. योगेश पाटील, डॉ. विलास गावीत, प्रा. तुषार पाटील, प्रा. सागर सैंदाणे, प्रा. गोपाल बडगुजर यांसह विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोपाल बडगुजर यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रा. सागर सैंदाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात मराठी विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!