महाभोमयागाने श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्याला सुरुवात

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, एकनाथराव खडसे यांनी घेतले दर्शन

अमळनेर : येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात जन्मोत्सवा निमित्त तीन दिवसीय महासोहळा पर्वाची सुरुवात २९ ऑगस्ट रोजी श्री महाभोमयागाने झाली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी येऊन दर्शनाचा लाभ घेतला. भाद्रपद शुद्ध दशमी या तिथीनुसार दरवर्षी मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळग्रह देवाचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. यंदाचे २०२५ हे वर्ष मंगळग्रह देवाच्या प्रभावाचे आहे. श्री मंगळ ग्रहाच्या प्रभावाच्या वर्षात मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे यास महामंगल योग म्हणतात. तो यावर्षी मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे २९ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

नियोजनाप्रमाणे २९ ऑगस्ट रोजी श्री महाभोमयागाने या महासोहळ्याची सुरुवात झाली. दुपारी एक वाजता सुरु झालेल्या श्री महाभोमयागाचे लंडनस्थित विशाल जगन्नाथ पाटील, पिंपळगाव हरेश्वरचे राजेंद्रसिंह जयसिंगराव आव्हाड, नाशिकचे मिलिंद बाबुराव वाघ, पाळधीचे प्रतापराव गुलाबराव पाटील, अमळनेरचे अतुल आत्माराम साबे, एस. एन. पाटील, गुलाब महाजन, अनिल कदम आणि उमेश पाटील हे सपत्नीक यजमान होते. सायंकाळी महाभोमयागाची पूर्णाहुती होऊन महाआरतीने सांगता झाली. मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक, जयेंद्र वैद्य, प्रसाद भंडारी, तुषार दिक्षित, मेहुल कुलकर्णी, यतिन जोशी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, व्यंकटेश कळवे, चंद्रकांत जोशी, अथर्व कुलकर्णी, सारंग पाठक यांनी पौराहित्य केले. तर गोपाल पाठक यांनी सहकार्य केले. दरम्यान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते एकनाथराव खडसे यांनी सपत्नीक श्री मंगळ ग्रह देवाचे दर्शन घेतले.

  • भेटीचा योग जुळला : संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री… अनेक वर्षांपासून मंदिराला भेट देण्याची माझी इच्छा होती आणि आज श्री मंगळ जन्मत्सवानिमित्त तो योग जुळून आला. देवाच्या मनात आले तर कुठे काय निर्मिती होऊ शकते याची प्रचिती याठिकाणी आली. एकेकाळी निर्जन असलेल्या ठिकाणी मंदिराचा विकास पाहून आज जगभरातील भाविक दर्शन, पूजा, अभिषेकसाठी येत आहेत, हे विशेष.
  • मंदिराने वेगळेपण सिद्ध केले : एकनाथराव खडसे, ज्येष्ठ नेते… २७ वर्षानंतर श्री मंगळ जन्मोत्सवाच्या महामंगलप्रसंगी दर्शनाचा लाभ मिळाला हे माझे भाग्य समजतो. अवघ्या २० ते २५ वर्षात मंदिराचा विकास झाला आणि देशाबरोबरच जगभरातील भाविकांचा ओघ वाढला. मंगळग्रह मंदिराची महती सर्वदूर पसरली आहे. याठिकाणचे व्यवस्थापन, स्वच्छता, नैसर्गिक व भक्तिमय वातावरण यामुळे या मंदिराने वेगळेपण सिद्ध केले आहे. भविष्यात या मंदिराचा अधिकाधिक विकास होईल, यात तिळमात्र शंका नाही असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी काढले.

याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, जयश्री साबे आदींनी त्यांचा सत्कार केला. मंगल सेवेकरी विनोद कदम, आशा महाले, आनंद महाले, पुषंद ढाके, बाळा पवार, आर. टी. पाटील, जी. एच. चौधरी, व्ही. व्ही. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!