दोनदिवसीय राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत ‘प्रताप’ चा संघ अव्वल

करिअर कौन्सिलिंग सेंटर, प्रताप कॉलेज व रुसा यांचा संयुक्त उपक्रम; प्रश्न मंजुषा स्पर्धेचे दहावे वर्ष

अमळनेर : राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष, करिअर कौन्सिलिंग सेंटर यांच्यावतीने अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दिनांक १५ व १६ सप्टेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयीन संघाने उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. एकूण ३० महाविद्यालयांनी आपल्या नावाची नोंदणी केली होती प्रत्यक्षात २८ महाविद्यालयातील संघ उपस्थित होते. यात, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय -धर्माबाद जि. नांदेड, एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालय -धुळे, पी. ओ. नहाटा महाविद्यालय – भुसावळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ – भौतिकशास्त्र प्रशाला, जळगाव, मूळजी जेठा महाविद्यालय -जळगाव, जी. टी. पी महाविद्यालय -नंदुरबार, सिताराम गोविंद पाटील महाविद्यालय -साक्री, दादासाहेब दिगंबरराव पाटील महाविद्यालय -एरंडोल असे विविध २८ संघ स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता पूज्य साने गुरुजी सभागृहात प्रताप कॉलेजचे माजी विद्यार्थी तथा सध्या अमरावती शहराचे एपीआय अमरसिंग वसावे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव क्राईम ब्रँच पीएसआय मुस्तफा मिर्झा (कौन बनेगा मराठी करोडपती विजेता) हे उपस्थित होते. राज्यशास्त्र विभागाचे डॉ.हर्ष नेतकर यांच्या समवेत राजनंदिनी यादव आदींच्या स्वागत गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी माता सरस्वती देवी, दानशूर कर्मयोगी -श्रीमंत प्रताप शेठजी, पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विजय तुटे यांनी केले तर उपस्थित उद्घाटक व प्रमुख अतिथी यांचा परिचय प्रा.वृषाली वाकडे यांनी करून दिला.

उद्घाटक एपीआय अमरसिंग वसावे म्हणाले की, माझे जीवन स्पर्धा परीक्षामुळे घडले. यासाठी योग्य मार्गदर्शन व नियोजन आवश्यक आहे. करिअर कौन्सेलिंग सेंटरच्या विविध उपक्रमामुळे माझी ज्ञानाची भूक भागली. स्पर्धा परीक्षेत प्रश्नांचे स्वरूप समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.विजय तुंटे, डॉ.माधव वाघमारे लिखित ‘भारताचे संविधान’ व ‘आधुनिक भारतीय राजकीय विचार‘ या दोन पुस्तकांचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पीएच.डी पदवी मिळाल्यामुळे डॉ. ज्ञानेश्वर दत्तात्रय कांबळे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पीएसआय मुस्तफा मिर्झा म्हणाले की, आज विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे. सर्व प्रश्नांचे स्वरूप बदलले आहे तसेच ३६० डिग्री मध्ये स्पर्धा बदलली आहे म्हणून प्रत्येकाने आपली निर्णय व आकलन क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना घड्याळाकडे पाहू नका, संघर्ष करा. ‘संघर्ष’ मोठे होण्याचे एक कारण असल्याचे सांगितले. याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्योपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, जेष्ठ संचालक प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे यांनी मार्गदर्शन केले. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना रुपये एक लाखाचे बक्षीस डॉ.अनिल शिंदे, डॉ.एस ओ माळी व डॉ.धीरज वैष्णव यांच्याकडून प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. उपस्थित सर्व स्पर्धकांना यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंचावर खानदेश शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरीताई पाटील, संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील, महाविद्यालयीन शिक्षक प्रतिनिधी प्रा. दिनेश भलकार, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे,करियर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, प्रश्न मंजुषा स्पर्धेचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर मराठे, संयोजीका प्रा.वैशाली राठोड यांच्यासह आयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, विविध महाविद्यालयाचे संघ व्यवस्थापक तसेच बहुसंख्येने विद्यार्थी देखील उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. नलिनी पाटील यांनी केले तर आभार संयोजिका प्रा. वैशाली राठोड यांनी मानले.

राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे पहिल्या फेरीमध्ये एकूण २८ संघा पैकी १५ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले, उपांत्य फेरीतून अंतिम फेरीमध्ये ५ संघांची निवड करण्यात आली. त्या पाचही संघाला स्पर्धा परीक्षा संचलन समितीने प्रश्न विचारले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.नलिनी पाटील, प्रा.वैशाली राठोड, प्रा.वृषाली वाकडे, डॉ.वंदना भामरे, प्रा.वैशाली महाजन यांनी काम पाहिले. दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण पार पडले. समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपविभागीय अधिकारी विनायकराव कोते उपस्थित होते. मंचावर अतिथी म्हणून प्रताप महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य, संस्थेचे माजी चिटणीस डॉ. एस. ओ. माळी उपस्थित होते. अतिथींचा परिचय डॉ.जितेंद्र बी पाटील यांनी करून दिला. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, कोषाध्यक्ष नितीनजी विंचुरकर, लायन्स क्लब सीनियर बोर्ड मेंबर डॉ.युसूफ पठाण, डॉ. रवींद्र जैन, डॉ. विनोद जैन, विनोद अग्रवाल, डॉ. मिलिंद नवसारीकर, मा. प्रशांत सिंघवी, मा. दिलीपजी गांधी, मा. प्रसन्न शहा, लायन्स क्लबचे सदस्य आणि खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक प्रदीप अग्रवाल उपस्थित होते. पोलीस उपविभागीय अधिकारी विनायकरावजी कोते व डॉ. माळी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

समारोप प्रसंगी राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत दोन दिवसात आलेले अनुभव कथन करताना एसपीडीएम कॉलेज शिरपूरची विद्यार्थिनी प्रियंका पाटील आणि जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव येथील गायत्री आमले यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी संघ व्यवस्थापक म्हणून पी. बी. बागल महाविद्यालय, दोंडाईचा येथील प्रा. यादव बोयेवार आणि किसान महाविद्यालय, पारोळा येथील प्रा.डॉ.शशिकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. लायन्स क्लब तर्फे नितीनजी विंचुरकर, डॉ.मिलिंद नवसारीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण प्रसंगी प्रा.वृषाली वाकडे यांनी सूत्रसंचालन केले तर दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विजेत्यांची नावे गणित विभाग प्रमुख डॉ.नलिनी पाटील यांनी जाहीर केले.

  • राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते….
  • १. प्रथम = प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर (रुपये-१०,००० डॉ.एस. ओ. माळी व परिवार तर्फे) विजेते विद्यार्थी – आफ्रिन पठाण, उमेश कुंभार
  • २. द्वितीय = एस पी डी एम महाविद्यालय, शिरपूर (रुपये-७,००० लायन्स क्लब,अमळनेर तर्फे) विजेते विद्यार्थी– उमेश वळवी, प्रियंका पाटील
  • ३. तृतीय = पंडित जवाहरलाल नेहरू एम. एस. डब्ल्यू महाविद्यालय, अमळनेर (रुपये ५००० स्व.गोविंददादा मुंदडे यांच्या स्मरणार्थ राकेश मुंदडे, पंकज मुंदडे, चिराग मुंदडे व परिवार तर्फे) विजेते विद्यार्थी– विशाल पाटील, चैताली पाटील
  • ४. उत्तेजनार्थ पहिले = नवलभाऊ बीएड महाविद्यालय, अमळनेर. विजेते विद्यार्थी – मयूर पाटील, योगेश पाटील
  • ५. उत्तेजनार्थ दुसरे = जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव (स्व.रसिकलाल गुजराथी यांच्या स्मरणार्थ दोन्ही उत्तेजनार्थ बक्षीसे प्रा.जयेश गुजराथी यांच्या तर्फे) विजेते विद्यार्थी – गायत्री आमले, लालन डोळसे

दोन दिवसीय स्पर्धेत विद्यार्थ्यांना प्रा.देवेंद्र तायडे, प्रा.प्रशांत ठाकूर, डॉ.रवी बाळसकर, डॉ.जितेंद्र पाटील, डॉ किरण गावित, डॉ अनिल झळके, डॉ.ज्ञानेश्वर मराठे आदींनी प्रश्न विचारले. यावेळी प्रमुख अतिथीच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या. समारोप कार्यक्रमाचे संयोजक डॉ.ज्ञानेश्वर मराठे यांनी आभार मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने वायोलिनद्वारे डॉ.हर्ष नेतकर यांनी केली. दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आदींनी विशेष सहकार्य केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!