अमळनेर तालुक्यात खवशी बुद्रुक येथील श्री गुरुदत्त सहकारी दूध उत्पादक संस्थेस प्रथम क्रमांकाचे बक्षीस

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित जळगाव ची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज उत्साहात पार पडली. सभेला उपस्थित राहून संघाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. तसेच सभासद शेतकऱ्यांनी मांडलेले प्रश्न गांभीर्याने ऐकून घेऊन त्यावर सखोल चर्चा करून उपाययोजना सुचवल्या. यावेळी जलसंपदामंत्री गिरीशजी महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अनिल भाईदास पाटील, दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांच्यासह संचालक उपस्थित होते.

दूध संघ केवळ दूध संकलन व विक्रीपुरता मर्यादित न राहता, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या विविध योजना राबवून शेती व दुग्ध व्यवसायाला बळकटी देत आहे, ही बाब खरोखरच उल्लेखनीय आहे. दरम्यान सन २०२४-२५ या वर्षी जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट दूध संकलन करणाऱ्या दूध उत्पादक संस्थांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र स्वरूपात बक्षीस देण्यात आले. यात अमळनेर तालुक्यातील खवशी बुद्रुक येथील प्राथमिक श्री गुरुदत्त सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्थेस प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. दूध संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दंगल पाटील व सेक्रेटरी चंद्रकांत कन्हैयालाल पाटील यांनी बक्षीस स्विकारले. खवशी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.