मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदीय व्याख्यानमालेचा समारोप

अमळनेर : लेखन, दिग्दर्शन आणि त्या खालोखाल प्रशिक्षण म्हणजेच शिकवणे. चांगला प्रेक्षक घडविणे अत्यंत महत्त्वाचे. विद्यार्थ्यांचा कल पालक लक्षात घेत नाहीत यामुळे ते अस्वस्थ असतात. पालकांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांचे मन जाणून घेतले पाहिजे. आवश्यक तेथे पालकांनी केलेल्या अपमानास्पद वागणूकीने मी हे करु शकतो हा आत्मविश्वास वाढून व्यक्तिमत्त्व घडते असा अनुभव मुंबई येथील सिने अभिनेता, दिग्दर्शक व लेखक श्री योगेश सोमण यांनी व्यक्त केला. अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे समारोपीय पुष्प गुंफताना ते ‘कला क्षेत्राचा समाज मनावर होणारा प्रभाव’ या विषयावर व्याख्यान करताना बोलत होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख मान्यवरांचा परिचय व सत्कार करण्यात आला. विचारमंचावर प्रमुख वक्ते सिने अभिनेता, दिग्दर्शक व लेखक श्री योगेश सोमण यांचेसह खासदार स्मिताताई वाघ, मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष शामकांत भदाणे, डॉ. संदीप जोशी, डॉ. मयुरी जोशी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुषमाताई देसले, सदस्य वसुंधरा लांडगे, प्रा. शीला पाटील, स्नेहा एकतारे, भैय्यासाहेब मगर उपस्थित होते. यावेळी पत्रकार बांधवांचाही सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी प्रास्ताविक केले.
व्याख्यानमाला सुरु करुन सतत चालू ठेवणे कठीण असते. पण.. मराठी वाड्मय मंडळ हे कार्य अविरतपणे पुढे नेऊन विचारांची मेजवानी देत असते हे विशेष. कोणताही कलाकार हा कलेत जिवंतपणा आणतो तर राजकारणी समाजकारणात संतुलन राखत असतो.
… खासदार स्मिताताई वाघ.
जीवनातील अनुभव कथन करताना आपण कुठे होतो व काय झालो ? याचा लेखाजोखा मांडताना श्री योगेश सोमण म्हणाले की, आपण कधीही आपल्या दुःखाची आपल्या समस्यांची दखल घेत नाही. आपल्या अडीअडचणींशी प्रतिनिधित्व करणारे म्हणून त्या कलेेकडे त्या लेखनाकडे त्या वेळेला बघितलं जातं पण त्याचा जो एक समग्र परिणाम आपल्यावर व्हायला पाहिजे तसा आपल्यावर कधीही होत नाही. युरोपियन कला क्षेत्रात जेव्हा इंग्रजी चित्रपट, इंग्रजी नाट्य करते. युरोप मधले चित्रकार कवी यांचा त्या त्या वेळेला जो सामाजिकतेवर परिणाम झालेला आहे. तसा परिणाम भारतीय साहित्य व कलांचा थेट परिणाम आतापर्यंत समग्र रूपाने समाजावर कधी झाला नाही. माझ्या आठवणी नुसार त्या त्या वेळेला काही वेळेपुरता काही साहित्यिकांच्या साहित्याचा अथवा त्यावर भेटलेल्या चित्रपटांचा परिणाम होतो परंतु कायमस्वरूपी किंवा एखाद्या चित्रपटामुळे एखाद्या चित्र प्रदर्शनीमुळे, एखाद्या साहित्यामुळे क्रांती घडवून समाजामध्ये प्रचंड असं परिवर्तन घडलंय असं मात्र कधी झालेलं नाही. आपण एका विशिष्ट अंतरावर या सर्व कला त्याची अनुभूती त्यातून मिळणारे अनुभव, त्याच्यातून आपल्याला जे घ्यायचं आहे ते आपण काही अंतरावरतीच कायम ठेवत आलेलो आहोत.
अमळनेरचे वैभव जोपासण्याची जबाबदारी आपली असून मंडळाला दोन वेळा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यजमानपद लाभले ही अभिमानाची गोष्ट आहे. व्याख्यानमालेच्या यशामागे मंडळाचे सर्व पदाधिकारी, देणगीदार व रसिक श्रोते यांचे परिश्रम आहेत. पुढील वर्षी ७५ व्या वर्षानिमित्त कार्यक्रम भव्य दिव्य करण्याचा मानस आहे.
… डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष, म.वा. मंडळ, अमळनेेर.
ते पुढे म्हणाले.. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जन्मावा पण ते एक घर सोडून जन्मावेत असं अनेक घरात नेहमी म्हटलं जातं. कारण.. अशी आपत्य वाढवण्याचा, जोपासण्याचा, संस्कारित करण्याचा, मोठ्या करण्याच्या बाळंतकळा असतात. त्या कुटुंबाची तयारी असतेच असं नाही तसंच असं रसरशीत काही परिणामकारक करू शकते अशी कलाकृती जन्माला घातल्यानंतर त्या कळा सोसण्याची तयारी ही जरी कलावंताची असली तरी त्यात तेवढ्या पद्धतीने अंगावर घेऊन त्याच्यावरती विचार करून आपल्याच परिवर्तन करण्याची तयारी प्रेक्षकांची, रसिकांची, समाजाची नसते असा माझा गेल्या ३५ वर्षांचा अनुभव आहे. म्हणूनच आपण वैयक्तिक सुरुवात करून माझ्यावर कला क्षेत्रात किती परिणाम झाला याची आपण दर वेळेला तुलना करत जावं असं मला वाटतं. समाजामध्ये सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, वैज्ञानिक अशा सर्व पद्धतीचे चेंजेस अनुभवलेली पिढी नेहमीच चांगल्या गोष्टींना पाठिंबा देत. आता अँड्रॉइड मोबाईल तंत्रज्ञान वापरण्याचा अनुभव अनुभूती घेत आहेत .तंत्रज्ञान नव्हे तर बदललेले सामाजिक चित्र आहे. भ्रमणध्वनीमुळे एकमेकांचा संवाद थांबला आहे. वाचन संस्कृती कमी झाली याचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. कुटुंबातील संवाद कायम राखणे महत्त्वाचे आहे. जीवनातील अनुभव कला आणि कुटुंबातील नाते यांचा सुसंगत संकलन राखल्यास समाज आणि व्यक्ती दोन्ही प्रगल्भ होतील असे सांगितले.
कलेमध्ये अकलेच्या आधी ‘न’ आहे. तुम्ही करत असलेली प्रत्येक कृती बघत आहेत. बघून नंतर ती अनुभवाच्या पातळीवर पडताळून बघत आहे. ज्या वेळेला हा अनुभव आपल्याला मिळतो त्यावेळेला आपण हेच क्षेत्र का निवडलं, असा या क्षेत्राचा काय प्रभाव आहे यादृष्टीने विचार करणं आवश्यक वाटते. लेखक, दिग्दर्शक, प्रशिक्षक आणि अभिनेता अशा सर्व भूमिकांमध्ये गेली २५ वर्षांनंतर ओळख सुप्रसिद्ध नाटककार, पटकथाकार, लेखक बनली. कारण.. लेखक म्हणजे तुम्ही लिहिलेला, छापला गेलेला शब्द. आपण अभिमानाने म्हणू शकतो की, जो शब्द अभिजात मराठी भाषेच्या सारस्वतांमध्ये कुठे ना कुठे तरी नोंदवला गेलेला असतो. त्याच्यावरती विचार होऊ शकतो. मनामध्ये, वाचनामध्ये ते शब्द आले, लेखन आले तर ते पुन्हा पुन्हा लक्षात येते. लेखन हे शाश्वत आहे त्याला मरण नाही. दिग्दर्शक व प्रशिक्षक यातला फरक स्पष्ट करत त्यांनी चांगला प्रेक्षक घडविणे हेच शाश्वत कार्य असल्याचे सांगितले.
दुसरा प्रभाव म्हणजे व्यक्तीमत्व कसे असावे..? अभिनय हे काही तरी खोटं असतं. नक्कल करणे सोपे आहे पण ती खरी कला नाही. आनंद यादव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते आणि संत सूर्य तुकाराम अशा नावाच्या त्यांच्या तुकाराम महाराजांच्या चरित्रावरनं गदारोळ उठला होता त्यातल्या काही वर्णनामुळे वारकरी संप्रदाय संतप्त झाला होता. वारकरी संप्रदायाचा समाजमनावर प्रभाव पडतो. विचार करायला हवा.. संवाद मुखातून व्हायला हवा. रसग्रहण परखडपणे करायला हवे. भारतीय समाजाने कलाकृतीला नेहमी करमणुकी पुरते मर्यादित ठेवले. संत तुकारामांच्या काळात समाज मनावर जसा प्रभाव झाला तसा डिजिटल माध्यमामुळे कलेचे सादरीकरण बदलले आहे. पूर्वी पालक शिक्षकांच्या शिक्षेला पाठिंबा देत मात्र आता शाळेत जाऊन शिक्षकांना पालक प्रश्न करतात ही शोकांतिका शिक्षक पालक नात्यावर भाष्य करताना व्यक्त केली.
व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष शामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. मनसेलाल बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. शाम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापुरे, कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संदीप घोरपडे व नरेंद्र निकुंभ यांनी केले व आभार मानले.