
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संपूर्ण जगभरात नावाजलेले विद्यापीठ आहे. परंतु सध्याचे कुलगुरू सुरेश गोसावी व प्र-कुलगुरू पराग काळकर यांच्या आशीर्वादामुळे विद्यापीठ भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. अधिकार नसतानाही तृतीय श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना कार्यकारी अभियंत्याच्या सह्या करून आतापर्यंत कोटींचे बिले मंजूर केलेली आहेत याची संपूर्ण चौकशी कॅग मार्फत करावी यासाठी NSUI चे प्रदेश पदाधिकारी ॲड. कौस्तुभ पाटील यांनी दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. यातील एक याचिका ही सुमारे ३०० कोटींच्या आर्थिक अनिमिततेच्या संदर्भात तर दुसरी प्र. कुलगुरू पराग काळकर यांच्या नियुक्तीच्या वेळी त्यांनी लपविलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भात आहे.
पराग काळकर यांच्या विरोधात आर्थिक घोटाळाप्रकरणी एफआयआर झालेली असतानाही सुरेश गोसावी यांनी त्यांची प्र. कुलगुरू पदी निवड केली. तसेच विजय ढवळे हे तृतीय श्रेणी सिव्हिल ओवरसिअर कर्मचारी असून त्यांना सुरेश गोसावी यांनी कार्यकारी अभियंता स्थावर विभागाचा ३१ मार्च २०२२ रोजी अतिरिक्त कारभार दिला होता. एका तृतीय श्रेणीच्या कर्मचाऱ्याला प्रथम श्रेणीच्या पदाचा कार्यभार देणे नियमबाह्य आहे. दिनांक ०१/०३/२०२३ रोजी रविंद्र परदेशी यांची कार्यकारी अभियंता स्थावर विभाग या शासनमान्य पदावर नेमणूक झाली. शासकीय नियमाप्रमाणे परदेशी यांच्या कडे ढवळे यांनी कार्यभार हस्तांतरित केला तसा अहवालही कुलसचिव कार्यालयाला दिला गेला असे माहिती अधिकारात विद्यापीठाने माहिती दिली आहे. सबब ढवळे यांचा कार्यकारी अभियंता स्थावर विभाग या पदाचा अतिरिक्त कारभार ०१/०३/२०२३ रोजी आपोआप संपुष्टात आला. असे असतानाही ढवळे हे नियमबाह्य पद्धतीने मार्च २०२५ पर्यंत कार्यकारी अभियंता स्थावर विभागाचा कारभार पाहत होते. अधिकार नसतानाही निविदा प्रसिद्ध करणे, देयके मंजूर करणे, पत्रव्यवहार करणे इ. कामे ढवळे करत होते. मागील ३ वर्षात जवळपास ३०० कोटींची बिले ढवळे यांनी अधिकार नसतानाही मंजूर केली आहेत.
एखाद्या विभागाचा अतिरिक्त कारभार सोपविताना शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत. एखाद्या विभागाचा अतिरिक्त कारभार एकाच प्रशासकीय विभागांतर्गत प्रशासकीय सोय लक्षात घेऊन त्याच कार्यालयातील सर्वात सेवाजेष्ठ अनुभवी व कार्यक्षम अधिकारी यांच्याकडे सोपवावा अशा स्पष्ट सूचना आहेत. परंतु कुलगुरू व प्र-कुलगुरू यांनी या सूचना धाब्यावर बसवून तृतीय श्रेणीतील सिविल ओवरसिअर ढवळे यांना अतिरिक्त कार्यभार दिला. यामागे खूप मोठे अर्थकारण दडले आहे. सुरेश गोसावी व पराग काळकर यांनी ढवळे यांच्या माध्यमातून कोटींची माया जमवली आहे. ०१/०३/२०२३ पासून रविंद्र परदेशी हे कार्यकारी अभियंता स्थावर विभाग या पदावर रुजू झाले असतानाही ढवळे हे बिले मंजूर करत होते. या बाबत परदेशी यांनी कुलगुरूं कडे तक्रार करूनही कुलगुरू सुरेश गोसावी यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. ऑगस्ट २०२५ मध्ये पुन्हा विजय ढवळे यांच्या कडे कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. विद्यापीठाच्या बिल्डिंग अँड वर्कस समितीचे कुलगुरू अध्यक्ष आहेत व प्र. कुलगुरू हे सदस्य असून कार्यकारी अभियंता हे सचिव आहेत. बिल्डिंग अँड वर्कस समिती विद्यापीठामध्ये विविध प्रकारची पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामे करत असते आणि त्यासंबंधी निविदा काढणे, निविदा मंजूर करणे, बिले मंजूर करणे अशी कामे ही समिती करत असते. या समितीच्या माध्यमातून अवैध पद्धतीने बिले मंजूर करून कुलगुरू, प्र. कुलगुरू व विजय ढवळे यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. प्र. कुलगुरू यांच्यावर यापूर्वीच मोठ्या आर्थिक घोटाळयाप्रकरणी गुन्हा दाखल असतानाही सदर समितीमध्ये प्र. कुलगुरू यांची निवड केली असे याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी आणि सरकार कडून मिळालेले अनुदान हे विद्यापीठाच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहेत आणि त्यातून विद्यापीठातील विकासाची, संशोधनाची कामे होत असतात, विद्यार्थी, शिक्षक यांना सोयी सुविधा पुरविण्यात येतात. परंतु भ्रष्ट पदाधिकाऱ्यांमुळे विद्यापीठाच्या विकासावर संशोधनावर होणाऱ्या खर्चावर परिणाम होतो. भ्रष्ट अधिकारी कंत्राटदारांसोबत संगनमत करून वाढीव बिले मंजूर करून घेतात त्यामुळे विद्यापीठावर आर्थिक बोजा पडतो. अलीकडेच NIRF मानांकन प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये विद्यापीठाची घसरण झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी कुलगुरू आणि प्र. कुलगुरू यांचा भ्रष्ट कारभार जबाबदार आहेत.
कुलगुरू आणि प्र. कुलगुरू यांनी विद्यापीठाच्या नावलौकिकाला “काळे” फासले आहे. प्र- कुलगुरू पराग काळकर यांच्या विरोधात आर्थिक घोटाळ्या प्रकरणी चिंचवड पोलीस स्थानकामध्ये एफआयआर झालेली असतानाही सुरेश गोसावी यांनी त्यांची प्र- कुलगुरू पदी निवड केली. पराग काळकर यांचे चारित्र्य प्रमाणपत्रही विद्यापीठाकडे उपलब्ध नाही अशी माहितीही माहिती अधिकारात उघड झाली आहे. कुलगुरू यांनी जाणीवपूर्वक पराग काळकर यांचे चारित्र्य प्रमाणपत्र घेतले नाही. विद्यापीठातील कुलगुरू आणि प्र. कुलगुरू यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल NSUI चे प्रदेश पदाधिकारी ॲड. कौस्तुभ पाटील यांनी दोन याचिका दाखल केल्या आहेत आणि कुलगुरू, प्र. कुलगुरू व विजय ढवळे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यापीठाचे लेखापरीक्षण कॅग ने करावे अशीही मागणी NSUI चे प्रदेश पदाधिकारी ॲड. कौस्तुभ पाटील यांनी केली आहे.