मंगरुळ ता.चोपडा येथील रहिवासी सुदामराव जिजाबराव ठाकरे यांची कल्पकता

प्रत्येकाला काही ना काही छंद, आवड असते. यात कलेचा छंद काही औरच असतो. हस्तकलेचा छंद जपणारे चोपडा तालुक्यातील मंगरुळ येथील रहिवासी सुदामराव पाटील यांची कल्पकता घरात प्रवेश करणाऱ्या सर्वांना मोहून टाकते. घराच्या चार भिंतीत हस्तकलेचा सांस्कृतिक ठेवा सजवून त्यांनी आपलं घर बोलकं केलं आहे. समाजाला तो एक आदर्श ठरेल. घरात प्रवेश केल्यानंतर न बोलणारा माणूस देखील किमान भिंतीकडे पाहून निश्चितच बोलका होईल याची खात्री आहे. निमित्त होतं नवरात्र उत्सवाचं. गुरुवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी चोपडा तालुक्यातील मंगरुळ येथे द्वारकाधीश मित्र मंडळ तर्फे आर. बी. पाटील (कोकाकोला सर) यांचा ‘उलटी फिटिंग’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी आम्ही काही मित्रांनी प्रत्यक्ष भेट देऊन अनुभवले व माहिती घेतली.

हस्तकला म्हणजे हातांनी विविध वस्तू तयार करण्याची प्रक्रिया, जी एक छंद, आवड असू शकते. चित्रकला, शिल्पकला, सिरॅमिक्स आणि डिजिटल कला यांसारखे अनेक प्रकार असून त्याचे उपप्रकार हस्तकलेत आहेत. याशिवाय लोककला, नाट्यकला, संगीतकला, नृत्यकला, शास्त्रीय कला, सौंदर्यकला सारखे काही प्रकार आहेत. छंद जोपासताना अनेकांनी ते जगण्याचे साधन केले. कल्पना आणि भावना व्यक्त करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो, ज्यामुळे शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक विकास साधता येतो. कल्पनांना चालना देत त्यांनी स्वतःला व्यक्त केले. मानसिक आणि भावनिक विकास साधून हस्तकलेतून मन, शरीर आणि आत्म्याला समृद्ध केले. सांस्कृतिक ओळख जपत जागरूकता निर्माण केली.

हस्तकलेतून सुदामराव ठाकरे यांनी स्वतः लाकूड पासून बैलगाडी, आरसा फ्रेम, चारपाई, शो पीस, नाणी वापरुन जहाज, बंगई, पान पुडा अशा विविध आकर्षक वस्तू बनवल्या आहेत. याबरोबर त्यांनी भारत भ्रमण करताना विविध देशांतून धातूच्या अनेक आकर्षक मूर्ती विकत घेऊन संग्रहीत केलेल्या आहेत. यात पोपट पिंजरा, तोफ, घोडा टांगा, बैलगाडी, नटराज, काळवीट, घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज, घड्याळ, जहाज, पालखी, राधा कृष्ण, फुलदाणी, रथ, राजस्थानी टांगा, दिवा, अत्तरदाणी, गुलाबदाणी, नळ, बादली, कळशी, पकड, बंब आदी गृहोपयोगी वस्तू आहेत. या मूर्ती अर्थातच हस्तकलेचा सांस्कृतिक ठेवा चोपडा तालुक्यातील मंगरुळ येथील रहिवासी सुदामराव जिजाबराव ठाकरे यांनी आपल्या कल्पकतेने घराच्या चार भिंतीत सजवून घर बोलकं केलं आहे. आज घराच्या भिंती मोकळ्या व सुटसुटीत ठेवल्या जातात जुन्या गृहोपयोगी वस्तू हद्दपार झाल्या आहेत अशातच हा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी त्यांना पत्नी सौ. उज्वला ठाकरे यांचेसह कुटुंबियांची साथ लाभली असल्याचे त्यांनी सांगितले.
कागद किंवा कॅनव्हासवर रंग वापरून रेखाचित्रे काढणे तसं सोपं असतं. पण.. लाकूड, माती, धातू किंवा इतर साहित्यापासून एखादी वस्तू (शिल्प) तयार करणे खूप अवघड असते. कला आणि हस्तकला चळवळ (Arts and Crafts Movement) ही एक आंतरराष्ट्रीय चळवळ होती, जी १९ व्या शतकात ब्रिटीश बेटांवर सुरू झाली. या चळवळीचा उद्देश सजावटीच्या कलेचा दर्जा सुधारणे आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा होता. तोच उद्देश ठेवून सुदामराव ठाकरे यांनी हस्तकलेचा सांस्कृतिक ठेवा घराच्या चार भिंतीत सजवून घर बोलकं केले आहे. आज ती एक आदर्श वास्तू बनली आहे. या वास्तूत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आनंदाने स्वागत केले जाते ही एक जमेची बाजू आहे.