प्रेरणादीप व्याख्यान मालेचे पहिले पुष्प
अमळनेर : ‘माणसाने उपजत प्रेरणांची जोड सामाजिक उपक्रमांना दिली तर कोणत्याही क्षेत्रात विकास करणं शक्य आहे. यातून निश्चितच आपले व्यक्तिमत्त्व अधिक खुलत जाऊन व्यक्तिमत्त्व विकास होत असतो, असे मत मुंबईचे आयकर उपायुक्त डॉ.उज्वलकुमार चव्हाण यांनी मांडले. सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रेरणादीप व्याख्यान मालेचे’ पहिले पुष्प गुंफतांना “सामाजिक उपक्रमातून व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर ते बोलत होते.
येथील जी.एस.हायस्कूलच्या आय.एम.ए.हॉलमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग.स.पतपेढीचे उपाध्यक्ष शामकांत भदाणे होते.प्रमुख अतिथी म्हणून शिवशाही फाउंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे व सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंचचे संस्थापक सदस्य दत्तात्रय सोनवणे होते.
डॉ. चव्हाण पुढे म्हणाले की, वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे कौशल्य आत्मसात करावी लागतात. ‘खुर्ची व पद आपल्याला काम शिकवते. गावपातळीवर काम करणं सुरुवातीला अवघड असते पण त्यातून खरं व्यक्तिमत्त्व घडतं आणि त्याच्या परिणामाचा आनंद अवर्णनीय असतो. तुमच्या वागण्या-बोलण्यात सकारात्मक भाव दिसला पाहिजे. तुम्ही नकारात्मक असाल किंवा काही कारणांनी नाराज असाल तर समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडणार नाही ती व्यक्ती तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करेल. अशावेळी तुम्ही तुमचे मुद्दे त्याला पटवून सांगू शकत नाही समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना कंम्फरटेबल राहा, तुमच्या बॉडी लँग्वेज वर भर द्या त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकतात. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी खानदेशातील अहिराणी भाषेतून संवाद साधत श्रोत्यांची मने जिंकली. भाषेचा अभिमान असला पाहीजे बऱ्याच वेळा अहिराणी भाषा बोलताना काहींना कमीपणा वाटतो. पण भाषेतून भाषा जपली जाते हेही तितकेच महत्त्वाचे आहे म्हणून ज्या ठिकाणी आपण जातो त्याठिकाणी त्या भाषेचा सन्मान राखला पाहिजे असे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात शामकांत भदाणेे म्हणाले की, सानेगुरुजी शैक्षणिक विचार मंच व शिवशाही फाउंडेशन अमळनेर यांचा उपक्रम स्तुत्य असून यातून भावी पिढीला ज्ञान संस्काराची शिदोरी चांगल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळत असल्याचा आनंद आहे. त्यांचे प्रबोधनाचे काम भविष्यातही असेच सुरू राहतील. याप्रसंगी तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा वक्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात आदर्श शिक्षक अशोक पाटील, ग.स.च्या उपाध्यक्षपदी निवड झालेले शामकांत भदाणे, बाजार समितीच्या तज्ञ संचालकपदी निवड झालेले डी.ए.धनगर, स्काऊट पुरस्कार प्राप्त राजेंद्र सूर्यवंशी (कळमसरे), जी.एस.हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी पदोन्नती झालेले आर.सी.मोराणकर, पत्रकारितेत उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त ईश्वर महाजन यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशाही फाउंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे तर वक्त्यांचा परिचय निरंजन पेंढारे यांनी करून दिला. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मनोहर नेरकर यांनी केले.